CBI arrests Punjab Police DIG Harcharan Singh Bhullar : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) गुरुवारी लाचखोरीच्या प्रकरणात पंजाब पोलीसातील रोपर रेंजचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल (DIG) हरचरण सिंग भुल्लर यांना अटक केली आहे. पंजाबमधील मोहाली येथील त्यांच्या कार्यालयात दुपारी ही अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, CBI अधिकाऱ्यांनी त्यांना कथितपणे ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. फतेहगड साहिब जिल्ह्यातील मांडी गोबिंदगड येथील एका डिलरने यासंबंधी तक्रार दाखल केली होती. भुल्लर यांच्याबरोबरच ऑपरेशनचा भाग म्हणून आणखी एका व्यक्तीला सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

भुल्लर एका सुरू असलेल्या प्रकरणाच्या संदर्भात एका भंगार व्यापाऱ्याकडून दरमहा ५ लाख रुपये खंडणी मागील्याच्याचा आरोप आहे.

सीबीआयकडून भुल्लर यांचे कार्यालय, घर आणि इतरही ठिकाणी शोध घेण्यात आला, अटक केलेल्या या भुल्लर यांना थोड्या वेळासाठी हरियाणातील पंचकुला येथे नेण्यात आले आणि नंतर परत आणण्यात आले.

भुल्लर यांनी पटियाला रेंजचे DIG म्हणून सेवा दिल्यानंतर २७ नोव्हेंबर २०२४ रोजी रोपर रेंजचे DIG म्हणून पदभार स्वीकारला होता. ते पंजाबचे माजी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) मेहल सिंग भुल्लर यांचे पुत्र आहेत. सुरुवातीच्या काळात ते पंजाब पोलीस सर्व्हिस (PPS) चे अधिकारी होते, त्यानंतर त्यांना भारतीय पोलीस सर्व्हिस (IPS) मध्ये घेण्यात आले आणि २००७ बॅचची सिनिऑरिटी (seniority) देण्यात आली. भुल्लर यांनी एका विशेष तपास पथकाचे नेतृत्व केले होते, ज्याने शिरोमणी अकाली दलचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांची अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपावरून चौकशी केली होती.

रोपर पोलिसांचा आणि चंदीगड पोलिसांचा एका व्यक्तीच्या अटकेवरून समोरासमोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी रोपर रेंजचे DIG भुल्लर यांना अटक झाली आहे. नवनीत चतुर्वेदी नावाच्या या व्यक्तीने तो जनता पक्षाचा अध्यक्ष असल्याचे सांगितले होते आणि त्याने पंजाबमधून राज्यसभा निवडणुकीसाठी आपला नॉमिनेशन अर्ज देखील दाखल केला होता.

आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांनी चतुर्वेदीने नॉमिनेशन अर्जांवर त्यांच्या खोट्या सह्या केल्या असल्याचा आरोप केल्यानंतर रोपर पोलिसांनी चतुर्वेदीवर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी रोपर पोलीस पथकाने चतुर्वेदीला अटक करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चंदीगड पोलिसांनी त्याला ताब्यात देण्यास नकार दिला, ज्यामुळे ही अटक होऊ शकली नाही. या प्रकरणात अखेर रोपर न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि चंदीगड पोलिसांना चतुर्वेदीला रोपर पोलिसांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले.