राजस्थानातील सत्तानाटय़ात भाजप आणि काँग्रेस यांच्यात शनिवारी आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला. काँग्रेसने राज्यातील भाजप नेत्यांचे दूरध्वनी संभाषण चोरून ऐकल्याचा (फोन टॅपिंग) आरोप भाजपने केला असून याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. तर, लोकशाहीची हत्या होत असताना भाजपला मात्र फोन टॅपिंगचे दु:ख आहे, असे प्रत्युत्तर काँग्रेसने दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थानातील सत्तासंघर्षांवर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली असून काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे राजस्थानमधील लोकांचे नुकसान होत असल्याचे ट्वीट त्यांनी केले. गेहलोत सरकारला वसुंधरा ‘मदत’ करत असल्याचा आरोप भाजपचा मित्रपक्ष असलेल्या ‘आरएलपी’चे प्रमुख हनुमान बेनिवाल यांनी केला. त्यानंतर वसुंधरा यांनी मौन सोडले.

गेहलोत सरकार पाडण्यासाठी भाजपने काँग्रेस आमदारांना लाच देऊ  केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून त्यासंदर्भात केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसचे निलंबित आमदार भंवरलाल शर्मा आणि व्यापारी संजय जैन तसेच, शेखावत यांच्या फोन संभाषणाच्या कथित ध्वनिफितीतील तपशील काँग्रेसने पत्रकार परिषदेत जाहीर करून भाजप नेत्यांवर लाचखोरीचा आरोप केला होता. जैन यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, या फोन टॅपिंगवर भाजपने आक्षेप घेतला असून ध्वनिफीत बनावट असल्याचा दावा केला. फोन टॅप करण्यापूर्वी नियमांचे पालन केले होते का, यात गोपनीयतेचा भंग झाला आहे काय, असा सवाल भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला.

गेहलोत यांना १०९ सदस्यांचा पाठिंबा?

राजस्थानच्या २०० सदस्यांच्या विधानसभेत गेहलोत सरकारला १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भारतीय ट्रायबल पक्षाच्या दोन आमदारांचाही पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. बंडखोर काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या गटाला सुमारे २० आमदारांचे समर्थन असल्याचे मानले जाते. पायलट गटाच्या १९ आमदारांना अपात्र ठरवण्याबाबतच्या विधानसभाध्यक्षांच्या नोटिसीला उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हान याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

राष्ट्रपती राजवटीची मायावतींची मागणी

राजस्थानमधील राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले असून बसपाची दुसऱ्यांदा फसवणूक करून आमच्या आमदाराला  काँग्रेसमध्ये सामील करून घेतले आहे. त्यांनी फोन टॅपिंग करून बेकायदेशीर व घटनाबाह्य़ कृत्य केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi probe into phone tapping bjps demand abn
First published on: 19-07-2020 at 00:02 IST