CDS Anil Chauhan Warns Against Outdated Weapons : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष पेटल्याचे पहायला मिळाले. यावेळी दोन्ही देशांच्या लष्करी सामर्थ्याची झलक देखील जगाला पाहायला मिळाली. यादरम्यान भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) अनिल चौहान यांनी देशाच्या शस्त्रास्त्र सज्जतेबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. बुधवारी सीडीएस अनिल चव्हाण यांनी भारताच्या संरक्षण क्षमतांचे तातडीने आधुनिकीकरण करण्याची गरज बोलून दाखवली. आजचे युद्ध उद्याच्या तंत्रज्ञानाने लढले पाहिजे, जुन्या प्रणालींनी नाही, असे अनिल चौहान म्हणाले आहेत.
युएव्ही आणि काउंटर-अनआर्म्ड एरियल सिस्टीम्स (C-UAS) इंडिजनायजेशनवरील नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यशाळेत सीडीएस चौहान बोलत होते. यावेळी त्यांनी अधुनिक युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. “आपण आजचे युद्ध कालच्या शस्त्र प्रणालींने जिंकू शकत नाहीत,” असे अनिल चौहान म्हणाले. तसेच भारताने अत्यंत महत्त्वाच्या धोरणात्मक मोहिमांसाठी परदेशी तंत्रज्ञानावरील अवलंबत्व कमी करण्याची आवश्यकता आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“आयात केलेल्या तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे आपल्या सज्जतेला कमकुवत करते,” असेही सीडीएस चौहान म्हणाले.
मे महिन्यात भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना जनरल चौहान म्हणाले की, “पाकिस्तानने अन आर्म्ड आणि दारुगोळा असलेले ड्रोन सीमेपलीकडून सोडलेय “ज्यापैकी बहुतांश हे कायनेटीक आणि नॉन-कायनेटिक मार्गांनी निष्क्रिय करण्यात आले.”
“यापैकी कोणत्याही UAVने भारतीय लष्कर किंवा नागरी इमारतींना कसलेही नुकसान पोहचवले नाही,”असेही सीडीएस चौहान म्हणाले.
अधुनि युद्धात ड्रोन्सचा वाढता वापर अधोरेखित करताना सीडीएस म्हणाले की, “अलीकडे झालेल्या संघर्षाने दाखवून दिले की ड्रोन कशा प्रकारे टॅक्टिकल बॅलेन्स प्रमाणाबाहेर हलवू शकतात. त्यांचा वापर ही फक्त एक शक्यता नाही तर तो आपण अधिपासूनच सामना करत असलेले एक वास्तव आहे. “
सीडीएस चौहान यांनी यावेळी भविष्यातील हवाई मार्गाने येणार्या धोक्यांना प्रभावीपणे निष्प्रभ करण्यासाठी कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक प्रतिकारात्मक उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी त्यांनी ड्रोन आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण करण्याचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट केले.