चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीचे जम्मू आणि काश्मीरमध्ये परिणाम जाणवतील, असा इशारा देत काळजी व्यक्त केलीय. त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे, असंही रावत यांनी नमूद केलं. ते गुवाहाटीमधील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांना अंतर्गत सुरक्षेबाबत साक्षर करण्याची गरज असल्याचंही सांगितलं.

बिपिन रावत म्हणाले, “अफगाणिस्तानमध्ये सध्या जे घडत आहे त्याचे परिणाम जम्मू आणि काश्मीरमध्ये दिसू शकतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला त्यासाठी तयार राहायला लागेल. आपल्या सीमा बंद करा, देखरेख आणि टेहाळणी महत्त्वाची बाब आहे. बाहेरून देशात कोण येतंय याकडे आपली नजर असली पाहिजे. येणाऱ्यांची तपासणी करायला हवी.”

“आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही”

“सामान्य नागरिक आणि पर्यटकांना या कडेकोट तपासणीचा त्रास होईल. मात्र, हे सर्व त्यांच्या सुरक्षेसाठी आहे हे त्यांना समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नागरिकाला देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जागृक केलं पाहिजे. आपल्या सुरक्षेसाठी कुणीही येणार नाही, आपल्यालाच आपलं स्वतःचं, आपल्या लोकांचं आणि आपल्या संपत्तीचं संरक्षण करावं लागेल. देशाची अंतर्गत सुरक्षा आपल्यासाठी काळजीचा विषय आहे. याला तोंड देण्यासाठी आपल्याला नागरिकांना प्रशिक्षित करावं लागेल,” असं मत बिपिन रावत यांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शेजारी कोण येऊन राहतो याविषयी माहिती असली पाहिजे”

जनरल रावत म्हणाले, “जर देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचं/तिचं कर्तव्य समजलं तर आपल्याला देशाची अंतर्गत सुरक्षा राखू शकू. नागरिकांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत त्यांच्या कर्तव्याचं पालन करावं. प्रत्येक नागरिकानं आपलं कर्तव्य बजावलं तर आपल्याला या परिस्थितीचा सामना करता येईल. तुमच्या शेजारी कोण लोक येऊन राहतात याविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे.”

हेही वाचा : भारतात हिंदूंना शरणार्थी बनावं लागेल, पुढील १० वर्षात अफगाणिस्तानसारखी स्थिती… : कांचनगिरी

“आपण सतर्क असलो तर कोणताही दहशतवादी आपल्या शेजारी येऊन राहू शकत नाही. कुणालाही काहीही संशयास्पद वाटलं तर नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे. तसेच त्याविषयी पोलिसांना माहिती दिली पाहिजे,” असंही रावत यांनी नमूद केलं.