अजिंक्य जोशी
क्रीडा प्रकारांविषयी मला कायमच उत्सुकता असते, कारण इथे अनुमान बांधता येत नाही. अगदी अंदाजे एखाद्याचा नेम बरोबर लागला तर लागला, नाही तर इथे क्षणात चित्र पालटून जाते. मी क्रिकेटचा जाणकार नाही, पण जाणकारांच्या चर्चा ऐकायला, त्यात सामील व्हायला खूप आवडते. सामना सुरू झाला की अशा खुमासदार चर्चा आमच्या सेटवर बहराला येतात. ‘ह. म. बने. तु. म. बने.’चा संपूर्ण चमू सदा क्रिकेटमय असतो. आमच्या सेटच्या शेजारीच एक छोटेसे मैदान आहे. जिथे आम्ही मालिकेच्या सुरवातीपासून रोज क्रिकेट खेळतो आणि खास क्रिकेट खेळण्यासाठी दुपारचे जेवण लवकर आटोपले जाते. एकदा खेळताना आमच्या साहाय्यक मित्राला थोडी दुखापत झाली आणि ‘आता आपले क्रिकेट बंद’ असेच भाव प्रत्येकाच्या मनात आले. परंतु तसे झाले नाही ‘क्रिकेट का कारवाँ’ आजही सुरू आहे. एवढेच काय तर आमच्याकडे कुणाची जीत, कुणाची हार, कोण किती धावा करेल, कोण बाद होणार, यावर गमतीने पैज लावली जाते. दिग्दर्शकांसहित सर्वच कलाकार क्रिकेटवेडे असल्याने १६ जूनला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामान्याच्या दिवशी सुट्टी घेऊन सर्वानी एकत्र सामना पाहण्याचा विचार सुरू आहे.
(शब्दांकन : नीलेश अडसूळ)