जयेश शेवाळकर

क्रिकेट म्हटल्यावर गावाकडच्या अनेक आठवणी आठवतात. आम्ही शास्त्रशुद्ध किंवा शिस्तबद्ध क्रिकेट खेळत नव्हतो; पण खूप मजा यायची. आधी क्रिकेटविषयी खूप उत्सुकता होती. पण अलीकडे ती गंमत राहिलेली नाही. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मी कधीच चुकवत नाही. सध्याचा भारतीय संघ जागतिक दर्जाचा आहे. त्यामुळे भारताचा विश्चषकातील सामना पाहताना आपणच जिंकणार, ही भावना मनात दाटते. आपण एक सामना सोडून सगळे सामने जिंकलो आहोत. सगळ्याच खेळाडूंची कामगिरी चोख होते आहे; परंतु चांगली फलंदाजी करत नसल्यामुळे सध्या महेंद्रसिंह धोनीवर टीका होत आहे, ते योग्य नाही. मुळात भारतीय संघात खेळांडूची निवड करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काही नियम आहेत. त्यांनी तो संघ निवडलेला असतो. त्यामुळे खेळाडूंच्या निवडीवर आणि त्यांच्या कामगिरीवर कोणीही टीका करू नये, असे मला वाटते. सध्या रोहित शर्मा चांगल्या धावा काढत आहे, शतक झळकावत आहे, म्हणून त्याला डोक्यावर घेणे आणि इतर फलंदाज जे चांगला खेळ करत नाहीत, त्यांच्यावर टीका करणे चुकीचे आहे. तसेच कुठल्या खेळाडूने निवृत्ती घ्यायला हवी, कुठल्या नको, हे सांगण्याचा अधिकार आपला नव्हे. त्यामुळे आपण खिलाडूवृत्तीने आणि सुज्ञ प्रेक्षकाप्रमाणे खेळातला आनंद लुटायला हवा.

(शब्दांकन : भक्ती परब)