जबरदस्तीने ‘जय श्रीराम’ म्हणायला सांगत जमावाकडून मारहाणीच्या घटनांमध्ये देशात वाढ झाली आहे. मारहाणीच्या या घटनांचा निषेध करताना ४९ सेलिब्रिटींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. तसेच विविध विचारसरणी हीच भारताची ताकद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हे पत्र लिहिणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये अदूर गोपालकृष्णन, मनीरत्नम, अनुराग कश्यप, बिनायक सेन, सुमित्रो चॅटर्जी, अपर्णा सेन, कोंकणा सेन-शर्मा, रेवती, श्याम बेनेगल, शुभा मुद्गल, रुपम इस्लाम, अनुपम रॉय, परमब्रता, रिद्धी सेन आदी. सामाजीक कार्यकर्ते, चित्रपट निर्माते, अभिनेत्री-अभिनेत्यांचा समावेश आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात या सेलिब्रेटिंनी म्हटले की, राम बहुसंख्य समुदायासाठी पवित्र आहे, त्यामुळे रामचे नाव खराब करणे थांबवा. रामाचे नाव घेऊन देशात आजवर जमावाकडून मारहाणीचे २५४ गुन्हे घडले आहेत. ८४० घटनांमध्ये दलितांवर अत्याचार झाले आहेत. आपण अशा घटनांमधील गुन्हेगारांवर काय कारवाई केली? असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना विचारला आहे. यातील दोषींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करुन त्यांना जरब बसेल अशा शिक्षेची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.
दरम्यान, बिनायक सेन, दिग्दर्शक अंजन दत्ता आणि गौतम घोष यांनीही या पत्रावर सह्या करताना म्हटले की, सरकारविरोधात जर कोणी बोलले तर त्याला देशद्रोही किंवा अर्बन नक्शल ठरवले जाते, ही मानिसकता घातक आहे. शुभा मुद्गल यांनी म्हटले की, आपण अशा प्रकारच्या मॉब लिंचिंग विरोधात आहोत. तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रिद्धी सेन म्हणाल्या, देशात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी आम्ही पंतप्रधानांना पत्र लिहून सांगू इच्छितो की, भारताने नेहमीच लिंग, धर्म आणि जात विविधतेचे स्वागत केले आहे. आपल्या संविधानातील धर्मनिरपेक्षतेची किंमत आपण ठेवायला हवी.