पुणे/नवी दिल्ली : केंद्र सरकारने यंदाच्या (२०२३-२४) खरीप हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) भरघोस वाढ जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तिळाच्या हमीभावात सर्वाधिक ८०५ रुपये, तर मुगाच्या हमीभावात ८०३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून दरवर्षी हमीभाव जाहीर केले जातात. यंदा काहीसा उशिराने पण भरीव वाढीसह हमीभाव जाहीर करण्यात आले आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत ८०५ रुपयांच्या वाढीसह तिळाचा हमीभाव ८,६३५ रुपयांवर, तर ८०३ रुपयांच्या वाढीसह मुगाचा हमीभाव ८,५५८ रुपयांवर गेला आहे. देशातील तूर डाळीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर ४०० रुपयांच्या वाढीसह तुरीचा हमीभाव सात हजार रुपये करण्यात आला आहे.




बीएसएनएलसाठी ८९ कोटी
भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी दूरध्वनी कंपनीच्या ४जी, ५जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी ८९,०४७ कोटींच्या निधीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या खरेदीमुळे कंपनीला संपूर्ण देशात अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेचे जाळे पसरविणे शक्य होणार आहे. बीएसएनएलचे भांडवल १.५० लाख कोटींवरून २.१० लाख कोटींपर्यंत वाढविण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
पीक हमीभाव वाढ
तीळ ८,६३५ ८०५
मूग ८,५५८ ८०३
सामान्य भात २,१८३ १४३
चांगल्या दर्जाच्या भाताचा २,२०३ १४३
संकरित ज्वारी ३,१८० २१०
मालदांडी ज्वारी ३,२२५ ३५
बाजरी २,५०० १५०
नाचणी ३,८४६ २६८
मका २,०९० १२८
उडीद ६,९५० ३५०
भुईमूग ६,३७७ ५२७
सूर्यफूल ,७६० ३६०
सोयाबीन ४,६०० ३००
कारळा ७,७३४ ४४७
मध्यम प्रतीचा कापूस ६,६२० ५४०
लांब धाग्याच्या कापूस ७,०२० ६४०
(सर्व आकडे रुपये/क्विंटलमध्ये)