देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उदभवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल इशारा देताना म्हणाले कि, “जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, सगळे कष्ट व्यर्थ जातील”.

निष्काळजीपणामुळे वाढू शकतो संसर्गाचा धोका

डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, “आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा. करोना संपला असं समजू नका. मास्क वापरणं सोडून देण्यात वेळ अद्याप आलेली नाही. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व सण साधेपणाने घरातच साजरे केलेत तर खूप योग्य होईल. संसर्गाची गती मंदावली आहे. परंतु आपली जराशा निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वाढू शकते.” याचसोबत करोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत इशारा देताना डॉ पॉल म्हणाले की, “जेव्हा जेव्हा विषाणू बदलतो म्हणजे म्यूटेट होतो तेव्हा तो संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकतो.”

लसीकरणासाठी महिलांनी पुढे यावं!

डॉ. व्ही. के. पॉल यांनी यावेळी लसीकरणासाठी महिलांना पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, “महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची आहे.” यावेळी ते असंही म्हणाले कि, “ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीती आयोगाने करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत याआधीच इशारा दिला आहे. नीती आयोगाच्या मते, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे, आयोगाकडून सर्वसामान्यांना वारंवार सावध राहण्याचं आणि स्वतःची योग्य काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे.