नवी दिल्ली : अमेरिकेने लादलेल्या ५० टक्के आयातशुल्कामुळे अडचणीत सापडलेल्या निर्यातदारांना सहाय्य प्रदान करण्यासाठी सरकार उपाययोजना आखत आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. त्यामध्ये निर्यात चालना मोहीम आणि कर्जफेडीस मुदतवाढ अशा उपायांचा समावेश असेल.

बुधवारपासून लागू झालेल्या आयातशुल्कामुळे प्रामुख्याने यंत्रसामग्री, कोळंबी, कापड, चामडे आणि पादत्राणे, रत्ने आणि दागिने या श्रमकेंद्रित उद्योगांना मोठा फटका बसणार आहे. हे आयातशुल्क एकाच वेळी धोक्याची घंटा आणि निर्यातीच्या व्याप्तीत वैविध्य आणण्याची संधी आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. निर्यातदारांनी सरकारकडे प्रामुख्याने तरलतेच्या मुद्द्यावर मदत मागितली आहे. या सूचना विचारात घेतल्या जात आहेत. सरकारला निर्यातदारांच्या समस्यांची कल्पना आहे आणि त्यांना मदत करण्यासाठी पावले उचलली जात आहेत असे ते म्हणाले.

निर्यातीमध्ये विविधता आणणे, नवीन मुक्त व्यापार करारांची अंमलबजावणी, सहाय्यक उपाययोजना लागू करणे आणि वाढती देशांतर्गत बाजारपेठ यामुळे अमेरिकी आयातशुल्काच्या प्रभावापासून उद्योगांना संरक्षण मिळण्यात मदत होईल अशी अपेक्षा या अधिकाऱ्याने व्यक्त केली. या मोहिमेअंतर्गत, यंदाच्या अर्थसंकल्पात निर्यातदारांसाठी जाहीर केलेली सुमारे २५ हजार कोटींच्या सहाय्ययोजनेस सहा आर्थिक वर्षांसाठी (२०२५ ते २०३१) लागू करण्याचा विचार आहे. त्यामध्ये निर्यात प्रोत्साहन (१०,००० कोटींपेक्षा जास्त) आणि निर्यात दिशा (१४,५०० कोटींपेक्षा जास्त) या दोन उप-योजनांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

विचाराधीन असलेल्या उपाययोजना

– सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक निर्यातदारांसाठी आपत्कालीन पतहमी योजना

– निर्यात कर्जाच्या परतफेडीसाठी मुदतवाढ, जेणेकरून मालमत्तेचे मूल्य कमी न करता निर्यातदारांना काम करता येईल

– रोख तरलता आव्हान सुलभ करण्यासाठी निर्यात वसुली कालावधीला मुदतवाढ

अमेरिकेपुढे झुकू नका – भार्गव

नवी दिल्ली : आयातशुल्काच्या मुद्द्यावर भारताने अमेरिकेच्या दादागिरीपुढे झुकू नये असे मत मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांनी गुरुवारी व्यक्त केले. आपल्या देशाने आपली प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि एखाद्या देशाच्या धमकीविरोधात एकजूट राहायले हवे असे ते म्हणाले. मारुती सुझुकीच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) बोलताना त्यांनी सरकारच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले.

अध्यक्ष ट्रम्प यांनी अनेक मार्गांना विविध देशांना विचार करण्यास भाग पाडले आहे. पारंपरिक धोरणे आणि संबंध, विशेषतः मुत्सद्देगिरीमध्ये आयातशुल्काचा वापर पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. – आर. सी. भार्गव, अध्यक्ष, मारुती सुझुकी