नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ३ हजार ६२६ कोटींच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. हा टप्पा वनाझ-रामवाडी या पहिल्या टप्प्याचे विस्तारीकरण असेल. त्यामध्ये वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २-अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २-ब) या विस्तारीत मार्गांचा समावेश असेल.
दोन्ही उन्नत मार्ग १२.७५ किमी लांबीचे असून त्यामध्ये १३ मेट्रो स्थानके असतील. या विस्तारीकरणामुळे वेगाने विकसीत होणारे बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली ही उपनगरे मेट्रो सेवेशी जोडली जातील. हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्पामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार आणि आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय/बहुपक्षीय एजन्सींची समान गुंतवणूक असेल. या प्रकल्पामुळे पुण्यातील पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक मजबूत होऊ शकेल.
आणीबाणीच्या निषेधाचा ठराव
देशात आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला बुधवारी ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय मंत्रिमंडळाने आणीबाणीचा निषेध करणारा ठराव संमत केला. ‘‘आजच्या पिढीने आणीबाणीच्या काळातील दडपशाही पाहिलेली नाही. म्हणूनच आणीबाणीचे धोके काय असतात, याची माहिती तरुण पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे. देशात मजबूत लोकशाही व्यवस्था सुनिश्चित करणे हे आपले कर्तव्य आहे,’’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीमध्ये व्यक्त केल्याचे समजते. गेल्या वर्षी भाजपने २५ जूनला संविधान हत्यादिन पाळण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसार, बुधवारी देशभर बुधवारी संविधान हत्यादिन पाळण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दोन मिनिटांचे मौन बाळगण्यात आले.
पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा
● वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर २-अ)
● १.१२ किमी. स्थानके-२: कोथरूड बस डेपो, चांदनी चौक
● रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर २-ब) ● ११.६३ किमी. स्थानके-११: विमान नगर, सोमनाथ नगर, खरडी बायपास, तुळजाभवानी, उबाळे नगर, अप्पर खरडी रोड, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिद्धार्थ नगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी