अधिकाऱयांची नियुक्ती आणि बदलीचे अधिकार दिल्लीच्या नायब राज्यपालांनाच आहेत, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने एका परिपत्रकाद्वारे स्पष्ट केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेले हे परिपत्रक संशयास्पद असून, त्या माध्यमातून भ्रष्टाचारी अधिकाऱयांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, मोदी यांना दिल्लीतील भाजपच्या तीन आमदारांच्या साह्याने मागच्या दारातून दिल्लीचे सरकार चालवायचे आहे. नजीब जंग हे केवळ चेहरा आहेत. त्यांना निर्णय घेण्याचे कोणतेच स्वातंत्र्य नाही. सर्व निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत. आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त असल्यामुळेच मोदी सरकारचे धाबे दणाणले आहेत. दिल्लीतील निवडणुकीत भाजप हारली होतीच. आता असे परिपत्रक प्रसिद्ध करून आमच्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी प्रयत्नामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, हे सुद्धा स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. असे एकतर्फी परिपत्रक प्रसिद्ध करून मोदी यांना कोणत्या अधिकाऱयांना पाठिशी घालायचे आहे, याचीही माहिती द्यावी, असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central govt notification on decision of powers is a suspicious attempt to shield the corrupt says kejriwal
First published on: 22-05-2015 at 01:58 IST