बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करताना हे केंद्रीय ट्विटर सरकार असल्याची बोचरी टीका केली आहे. बिहारमधील गया येथे आज (रविवार) पंतप्रधान मोदींची परिवर्तन रॅली आहे. त्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी ट्विटरवरूनच केंद्र सरकारला ट्विटर सरकार असे संबोधले आहे.
बिहारमध्ये या वर्षअखेर विधानसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरवात केली आहे. बिहारमध्ये भाजप विरुद्ध सर्व पक्ष अशी लढत होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी ट्विटरवरूनचं टीका करत म्हटलं की, केंद्रातले सरकार हे ट्विटरवरून लोकांची गा-हाणी ऐकत आणि तिथूनच त्यांना प्रतिसाद देऊन कार्य करते. बिहारच्या राज्यपालपदी वरिष्ठ भाजप नेते रामनाथ कोविंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीश कुमार म्हणाले, की बिहारमध्ये राज्यपालांची नियुक्ती करताना राज्य सरकारला विश्वासात घेतलेलेच नाही. परंपरेनुसार केंद्रीय गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री व मंत्र्यांशी चर्चा करतात. पण, बिहारच्या राज्यपालांची नियुक्ती करताना कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही.