एका भाजपा नेत्याला लसीचे पाच डोस देण्यात आले असून सहावा डोस शेड्यूल केल्याचं त्याच्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रातून समोर आलंय. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील सरधाना भागात हा प्रकार घडलाय. तर, या प्रकरणात काहीतरी गैरसमज झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, ७३ वर्षीय रामपाल सिंग हे बूथ क्रमांक ७९ चे भाजपा अध्यक्ष आहेत आणि हिंदू युवा वाहिनीचे सदस्य आहेत. त्यांनी लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड केल्यावर त्यात त्यांना लसीचे पाच डोस देण्यात आल्याचं लिहिलंय. ते म्हणाले की, प्रमाणपत्रात पाच डोस पूर्ण झाल्याचं दाखवत असून सहावा डोस शेड्यूल करण्यात आला आहे. सिंग यांनी आरोग्य विभागावर निष्काळजीपणाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या तक्रारीनंतर या संदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सिंग म्हणाले की त्यांना लसीचा पहिला डोस १६ मार्च रोजी आणि दुसरा ८ मे रोजी मिळाला होता. मात्र जेव्हा त्यांनी अधिकृत पोर्टलवरून लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड केले, तेव्हा त्यात ५ डोस पूर्ण झाले असून सहावा डोस डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान शेड्यूल असल्याचे दिसून आले. प्रमाणपत्रावर पहिला डोस १६ मार्च आणि दुसरा डोस ८ मे रोजी दाखवतंय. तर, तिसरा डोस १५ मे आणि चौथा-पाचवा डोस १५ सप्टेंबरला घेतल्याचं दिसतंय.

मुख्य वैद्यकीय अधिकारी अखिलेश मोहन यांच्याशी पीटीआयने संपर्क साधला असता, ते म्हणाले की, लसीसाठी कोणाकडून दोनपेक्षा जास्त वेळा नोंदणी झाल्याची ही पहिलीच घटना आहे. प्रथमदर्शनी हा गैरप्रकार आणि षड्यंत्र वाटतंय. काही लोकांनी पोर्टल हॅक करून हा प्रकार केल्याचं दिसतंय. जिल्हा लसीकरण अधिकारी प्रवीण गौतम या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे, असंही मोहन यांनी सांगितलं.