Delhi Ashram Swami Chaitanyananda Saraswati case : स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर दिल्लीतील आश्रमात शिकणाऱ्या १७ विद्यार्थिनींनी लैंगिक छळाचे आरोप केले. त्या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, अटक वॉरंट निघताच स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला. १७ विद्यार्थिनींनी कलेले लैंगिक छळाचे आरोप ते लक्झरी कार्सना बसवलेल्या डिप्लॉमॅटिक प्लेट असे असंख्य आरोप स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती याच्यावर करण्यात आले आहेत. या आरोपांची यादी जेवढी मोठी आहे तितकेच आरोपांचे स्वरूप गंभीर आहे.
या चैतन्यानंद सरस्वती याच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर आता या आरोपीने आर्थिक पार्श्वभूमी कमकुवत असलेल्या विद्यार्थिनींचा कशा पद्धतीने लैंगिक छळ केला, त्यांच्यावर कशी पाळत ठेवली आणि त्यांनी विरोध केला तर त्यांना कशा पद्धतीने फेल करण्याची धमकी दिली याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. .
या स्वयंघोषित बाबच्या विरोधात तपास सुरू केल्यानंतर, यंत्रणांना आढळून आले आहे की चैतन्यानंद याने बँक खाती चालवण्यासाठी कथितपणे वेगवेगळी नावे आणि माहिती वापरत होता, पीटीआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. इतकेच नाही तर त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याने खात्यातून ५० लाख रुपये काढल्याचेही तपासकर्त्यांनी सांगितले.
३० हून अधिक विद्यार्थिनींच्या एका व्हर्च्युअल मिटिंगमध्ये उपस्थित अनेकी विद्यार्थिनींनी त्याच्याकडून झालेल्या लैंगिक छळ आणि धमक्यांविषयीच्या घटनांबद्दल सांगितल्याचे एका खासगी मॅनेजमेंट इंस्टिट्यूटच्या प्रशासनाने कळवल्यानंतर चैतन्यानंद याच्या विरोधात ४ ऑगस्ट रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
फरार असलेल्या चैतन्यानंद यांच्या वतीने अटकपूर्व जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या आर्थिक अनियमिततेच्या एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी हा जामीन अर्ज फेटाळला.
या बाबाच्या विरोधात तपास सुरू असतना त्याने कथितपणे दोन वेगवेगळ्या नावांनी बँक खाती उघडली असल्याचे आढळून आले आहे. इतकेच नाही तर ही खाती सुरू करण्यासाठी त्याने वेगवेगळी कागदपत्रे दाखल केली होती.
पोलिसांनी पुढे बोलताना सांगितले की जवळपास ५०-५५ लाख रुपये एफआयआर दाखल झाल्यापासून खात्यातून काढण्यात आली आहेत.
संबंधित बँक खाती गोठवली
दिल्ली पोलिसांनी स्वयंघोषित बाबाशी संबंधित १८ बँक खाती आणि २८ फिक्स्ड डिपॉझिटमधील सुमारे ८ कोटी रुपये गोठवले आहेत. हे पैसे चैतन्यानंद याने स्थापन केलेल्या ट्रस्टचे होते, ज्याला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळल्या होत्या असेही तपासकर्त्यांनी सांगितले.
चैतन्यानंद विद्यार्थ्यांवर नियंत्रण कसे ठेवायचा?
चैतन्यानंद सरस्वती याच्याविरोधात १७ विद्यार्थीनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यार्थिनींना तो त्यांचे मोबाइल फोन, ओरिजनल कागदपत्रे स्वत:कडे ठेवून घेऊन आणि भीतीचे वातावरण तयार करून ताब्यात ठेवत असे, असे वृत्त पीटीआयने एका पीडितेच्या मित्राच्या हवाल्याने दिले आहे.
मित्राने सांगितले की, “तो विद्यार्थी हेरायचा आणि मग त्यांना ‘अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे’ म्हणून त्यांचे फोन जमा करायला सांगायचा. त्यांचे फोन काही काळासाठी त्याच्या ताब्यात राहत असत आणि त्याच्या बदल्यात, तो त्याच्या पसंतीचा एक नवीन फोन त्यांना देत असे.”
चैतन्यानंद याचा पीडितांवर पूर्णपणे ताबा राहावा आणि ते इतरांशी संपर्क साधू शकू नयेत यासाठी हे केले जात असे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका व्यक्तीने असेही सांगितले की विद्यार्थ्यांना ओरिजनल कागदपत्रे, सर्टिफिकेट्स जमा करणे अनिवार्य होते, जे त्यांना कोर्स पूर्ण केल्यानंतरच परत दिली जात.