इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरचे माजी प्रमुख वैज्ञानिक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी देशातील करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मोठा दावा केला आहे. “करोनाची देशव्यापी तिसरी लाट येण्याची शक्यता खूपच कमी आहे. जरी आलीच तरीही ती दुसऱ्या लाटेच्या तुलनेत खूपच कमी तीव्रतेची असेल”, असा दावा रमण गंगाखेडकर यांनी केला आहे. न्यूज १८ ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. गेल्या वर्षी देशात करोना संसर्ग वाढू लागला तेव्हा ICMR चा मुख्य चेहरा ठरलेले डॉ. रमण गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली आहे. डॉ. रमण गंगाखेडकर मुलाखतीत पुढे असं म्हणाले की, देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता जरी कमी असली तरी शाळा पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयासाठी कोणतीही घाई करू नये.”

नव्या अभ्यासांनुसार लहान मुलांमध्येही करोनाचे दीर्घकालीन दुष्परिणाम आढळून आल्याचे देखील यावेळी डॉ. गंगाखेडकर म्हणाले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, “शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय सरसकट घेतला जाऊ नये. करोना रुग्णांच्या संख्येच्याआधारे ठराविक क्षेत्रातील शाळा उघडण्याचा निर्णय घ्यावा.” रमण गंगाखेडकर यांनी यावेळी असा विश्वास व्यक्त केला की, “कोविड-१९ इन्फ्लूएन्झा व्हायरससारखा संपू शकतो.” त्याचप्रमाणे, “करोना प्रतिबंधक लसीमुळे आता करोनाबाधित रुग्ण हे लक्षणेहीन म्हणजेच Asymptomatic असू शकतात किंवा त्यांना अगदी सौम्य लक्षणं जाणवू शकतात. पर्यायाने चाचण्यांची आणि करोनाबाधितांची संख्या देखील कमी होऊ शकते,” असेही ते यावेळी म्हणाले.

दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार

चौथ्या सिरो सर्वेनुसार, देशातील सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. देशात जसजशी लसीकरणाची व्याप्ती वाढेल तसतसे देशातील हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि मृत्यूच्या प्रकरणांची नोंद देखील कमी होईल. मात्र, करोना संक्रमणाच्या संख्येत वाढ होत राहिल. कारण, लसीकरणामुळे करोना संसर्गापासून संरक्षण मिळत नाही. या लसींच्या परिणामांमध्ये आजार बदलतात त्याप्रमाणे बदल होतो म्हणजेच या डिसीज मॉडीफाईंग लसी आहेत. परंतु, संसर्गापासून पूर्ण संरक्षण करण्याची क्षमता त्यांच्यात नाही.

नवीन स्ट्रेन सापडल्याशिवाय चिंता नाही!

डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, “करोना प्रकरणांची संख्या कायम राहू शकते. परंतु, नवीन स्ट्रेन येईपर्यंत आपल्याला काळजी करण्याचं काहीच कारण नाही.”