आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा एन लोकेश सध्या डोळे विस्फारायला लावणाऱ्या प्रगतीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. एन लोकेश यांनी सोमवारी आंध्र प्रदेशच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. त्यावेळी लोकेश यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आर्थिक प्रगतीचा आलेख पाहून अनेकजण अचंबित झाले. प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे ऑक्टोबर २०१६ मध्ये एन. लोकेश यांची संपत्ती १४.५० कोटी इतकी होती. मात्र, केवळ पाच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या संपत्तीचा आकडा थेट ३३० कोटींवर जाऊन पोहचला आहे. याशिवाय, एन. लोकेश याच्या नावावर कौटुंबिक मालकीच्या हेरिटेज फुडस लिमिटेड या कंपनीचे २७३, ८३, ९४, ९९६ इतक्या रकमेचे शेअर्सही आहेत. नायडू कुटुंबियांच्या मालकीच्या हेरिटेज फुडसचा काही हिस्सा गेल्यावर्षी किशोर बियानी यांच्या फ्युचर रिटेल लिमिटेडला विकण्यात आला होता. मात्र, अजूनही हेरिटेज फुडसमध्ये नायडू कुटुंबियांचा ३.६५ टक्के हिस्सा कायम आहे. याशिवाय लोकेश यांच्या नावावर १८ कोटींची स्थावर मालमत्ता, ३८.५१ कोटी रूपयांची वडिलोपार्जित रक्कम असून त्यांच्या डोक्यावर ६.२८ कोटींचे कर्जही आहे.

ऑक्टोबर २०१६ मध्ये लोकेश यांनी त्यांच्याकडे १४.५० कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. तर त्यांची पत्नी ब्राह्मणी हिच्या नावावर ५.३८ कोटी आणि एक वर्षांचा मुलगा देवांश याच्या नावावर ११.१७ कोटींची संपत्ती होती. यामध्ये ९.१७ कोटींच्या वडिलोपार्जित घराचा आणि २ कोटींच्या मुदत ठेवीचाही समावेश होता. मात्र, नव्या प्रतिज्ञापत्रात लोकेश यांनी आपली संपत्ती ३०० कोटी असल्याचे नमूद केल्याने अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. याबाबत खुलासा करताना एन. लोकेश यांनी म्हटले आहे की, माझ्या संपत्तीत फक्त गेल्या पाच महिन्यांतच वाढ झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये संपत्तीचा आकडा नमूद करताना मालमत्तांचे खरेदी मूल्य विचारात घेतले होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तांची किंमत प्रचलित बाजारभावानुसार नमूद करावी लागते, असे लोकेश यांनी म्हटले.