केंद्राकडून दरनिश्चितीपत्रक जाहीर; रुग्णांना दिलासा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठय़ा ‘आयुष्मान भारत’ या योजनेत किमान १३५० उपचार सुविधांसाठी  रु. १५०० ते रु.  १.५० लाखांपर्यंतचे दरनिश्चितीपत्रक जाहीर करण्यात आले असून यात उपचारांचे दर ठरवण्यात आल्याने, विमा आहे म्हणून रुग्णांची लूटमार होण्याची शक्यता कमी  होणार आहे.

सरकारने याबाबत २०५ पानांचे निविदापत्र जारी केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबामा हेल्थकेअरशी तुलना होत असलेल्या आरोग्य योजनेला अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले आहे. या निविदा पत्रिकेत उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून त्याच्या आधारे राज्य विमा योजनेत सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची यादी निश्चित करू शकतील. देशातील गरीब कुटुंबांना यात ५ लाख ते १० कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे. हृदयरोग, कर्करोग, मेंदूशस्त्रक्रिया, नवजात अर्भक उपचार यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे. उपचार व शस्त्रक्रिया यांचे स्वरूप यावरून दर ठरवण्यात आले आहेत.

ज्या परिस्थितीत रुग्णालयात दाखल करणे आवश्यक नाही अशा कुठल्याही उपचार खर्चास विमा कंपनी जबाबदार राहणार नाही. दरपत्रक  तयार करताना बराच अभ्यास करण्यात आला असून त्याची तपासणी नीती आयोगाने केली आहे, असे  सांगून आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण  म्हणाले की, आम्ही केवळ मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. त्यात राज्ये काही बदल करू शकतील.

रुग्णालयांची या योजनेतील पॅनल नोंदणी १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी विमा कंपन्यांकरिता राज्यांनी निविदा व लिलाव प्रक्रिया करायची आहे. दोन आठवडय़ात ही प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टमध्ये योजना प्रत्यक्ष सुरू केली जाणार आहे.

* आर्थोपेडिक म्हणजे हाडाच्या उपचारात स्कीन ट्रॅक्शनसाठी  १००० रुपये, तर अ‍ॅरोटीक आर्च रिप्लेसमेंट साठीच्या हृदय शस्त्रक्रियेकरिता १.६० लाख रुपये दर ठरवण्यात आला आहे.

* १३५४ उपचार योजनांपैकी ६१० प्रकारात आधी विमा कंपनीची परवानगी असणे आवश्यक आहे.  नॅशनल अ‍ॅक्रीडिशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअरच्या यादीतील रुग्णालयांना दरपत्रकापेक्षा १० ते १५ टक्के जादा दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदू भूषण यांनी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Charges fixed for treatment under ayushman bharat scheme
First published on: 26-05-2018 at 03:08 IST