Charlie Kirk shooter Tyler Robinson Chat with Partner Leaked : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्ती तथा उजव्या विचारसरणीचे पुरस्कर्ते चार्ली कर्क (वय ३१) यांची गुरूवारी (११ सप्टेंबर) यूटाह येथील महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमावेळी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. दरम्यान, हत्या झाली त्याच दिवशी एफबीआयने या प्रकरणातील संशयिताचे काही फोटो प्रसिद्ध केले होते. तसेच कर्क यांच्या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली रायफलही जप्त केली होती. त्यानंतर या हत्येप्रकरणी संशयित आरोपीची ओळख पटवून एका २२ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतलं. टायलर रॉबिन्सन असं या आरोपीचं नाव आहे.
या अटकेनंतर सदर हत्या प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे समोर येत आहेत. रॉबिन्सन याने त्याची पार्टनर व रूममेटला पाठवलेल्या मेसेजमध्ये गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच रॉबिन्सन याने हत्येच्या आधी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की “चार्ली कर्कला संपवण्याची संधी मिळणार आहे.” मात्र, रॉबिन्सनने चार्ली कर्क यांची हत्या का केली हे अद्याप उघड झालेलं नाही.
युटाह काउंटीचे अॅटर्नी जेफ ग्रे यांनी टायलर रॉबिन्सनचा एक संदेश सादर केला आहे. यामध्ये त्याने म्हटलं होतं की “तो (कर्क) द्वेष पसरवतोय आणि मला त्याचा कंटाळा आला आहे. कधीकधी द्वेष इतका असतो की त्यावर तोडगा निघू शकत नाही. इथेही तशीच स्थिती आहे.” असोशिएटेड प्रेसने (एपी) यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
टायलर रॉबिन्सनने पाठवलेले संदेश
रॉबिन्सनने चार्ली कर्कवर गोळीबार केल्यानंतर त्याच्या पार्टनरला या हत्येसंबंधी आणखी काही मेसेज पाठवले होते. त्यानुसार “मी गोळीबार केल्यानंतर माझी रायफल जिथे ठेवलेली ती लगेच दुसरीकडे नेण्याची योजना आखली होती. परंतु, त्या भागात पोलिसांनी नाकेबंदी केली आहे.”
“सगळीकडे भयान शांतता आहे. बाहेर पडण्यासाठी हे पुरेसं आहे, परंतु, पोलिसांची एक कार अजूनही तिथेच आहे.”
“मी रायफल परत आणण्याचा प्रयत्न करतो. मला आशा आहे की पोलीस आता तिथून गेले असतील. रायफल अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.”
“मी रायफल ठेवल्याच्या जागेजवळच आहे. परंतु, पोलिसांची एक कार तिथेच आहे. त्यांनी ती जागा तपासली असावी. मात्र, मी रिस्क घ्यायला तयार आहे.”
रॉबिन्सनने पार्टनरची माफी मागितली
रॉबिन्सनने रायफल एका ठिकाणी लपवली होती आणि तिथून तो फरार झाला होता. त्यानंतर तो त्याच्या पार्टनरला सतत रायफलबाबत मेसेज करत होता. त्याने पाठवलेले मेसेज त्याच्या पार्टनरने डिलीट करावे असंही त्याने सुचवलं. एका मेसेजमध्ये तो म्हणाला, “खरं सांगायचं तर मी हे गुपित माझ्या म्हातारपणापर्यंत असंच लपवून ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र मी तुला सांगून टाकलं. तुला या सगळ्यात ओढल्याबद्दल मला माफ कर.”
घरातील कॉम्प्यूटरच्या कीबोर्डखाली रॉबिन्सनने त्याच्या पार्टनरसाठी एक चिठ्ठी लिहिली होती. यामध्ये त्याने म्हटलं होतं की “मला चार्ली कर्कला संपवण्याची संधी मिळाली तर मी ती संधी सोडणार नाही.”