Chennai News : तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. चेन्नईमधील एन्नोर थर्मल पॉवर स्टेशनच्या बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळून भीषण दुर्घटना घडली आणि या घटनेत तब्बल ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हे छत ३० फूट उंचीवरून पडल्याची माहिती समोर आली आहे.

एन्नोर येथील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या या दुर्घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. प्राथमिक अहवालानुसार, औष्णिक वीज केंद्राचं काम सुरू होतं. हे काम सुरू असतानाच एक कमान (छत) सुमारे ३० फूट उंचीवरून अचानक कोसळलं. आणि त्यात अनेक स्थलांतरित कामगार अडकले गेले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, तामिळनाडू वीज मंडळाचे सचिव आणि तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. जे. राधाकृष्णन यांनी जखमी कामगारांना भेटण्यासाठी आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्टॅनली सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी घटनेबाबतची माहिती घेतली. एका कामगाराला गंभीर दुखापत झाली असून १० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आलं की, बांधकामाच्या ठिकाणी छत कोसळण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बचाव कार्य सुरू आहे आणि घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अडकले होते आणि त्यांना वाचवण्यात आलं आहे, तसेच अद्यापही बचावकार्य सुरू आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून मदतीची घोषणा

पंतप्रधान कार्यालयाने भरपाईची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी या प्रसंगी शोक व्यक्त केला. पीएमओ कार्यालयाने एक्स वरील पोस्टमध्ये म्हटलं की, “तामिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेनं दुःख झालं आहे. या कठीण काळात बाधित झालेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना. जखमींना लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना ५०,००० रुपयांची मदत दिली जाईल.”