दसरा म्हणजेच विजयादशमीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी दाराला तोरण बांधणे, गोडाधोडाचे जेवण आणि खरेदी हे ठरलेले असते. आता दसऱ्याचा हा सण याच दिवशी साजरा केला जातो हे आपल्याला माहित आहे. पण देशात असेही एक शहर आहे ज्याठिकाणी हा सण एक, दोन नाही तर तब्बल ७५ दिवस साजरा केला जातो. हा सण या शहरात देवी दंतेश्वरीसाठी साजरा करण्याचा प्रघात आहे. छत्तीसगडमधील बस्तर याठिकाणी साधारण अडिच महिने दसरा साजरा होतो. बस्तरमध्ये असलेल्या दंडकारण्यात रामाने वनवासातील बराच काळ घालवल्याने या भागाला विशेष महत्त्व आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दसऱ्याच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला त्यामुळे याठिकाणी दसरा साजरा होत नाही तर देवी दंतेश्वरीची पूजा केली जाते. या कार्यक्रमाची तयारी जवळपास ७० ते ७५ दिवस आधीपासून सुरु होते. विशेष म्हणजे दसऱ्यानंतरही हे रीतीरिवाज सुरुच राहतात. या काळात याठिकाणी एक दरबारही भरतो. त्यामध्ये बस्तरचे महाराज गावातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्यावर तोडगाही काढतात. यावेळी दसऱ्याच्या दिवशी विशेष रथयात्रा काढली जाते. यामध्ये असणारा रथ उपस्थितांचे विशेष आकर्षण असतो. रथ तयार करण्याची परंपरा ६०० वर्षांपासून सुरु असून केवळ संवरा जमातीचे लोक ते करतात. पण मागच्या काही काळात ही जमात देशातून जवळपास लुप्त झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या जमातीच्या लोकांना हा रथ तयार कराव लागतो. मात्र त्यासाठी या लोकांना आपली जात बदलावी लागते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh bastar dasara celebration for 75 days rituals of celebration festival
First published on: 18-10-2018 at 17:00 IST