कुख्यात गुंड छोटा राजनने पाच वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांची हत्या का घडवून आणली, याचे एक धक्कादायक कारण उजेडात आले आहे. हत्या झाली त्या काळात ज्योतिर्मय डे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर प्रकाश टाकणाऱ्या दोन पुस्तकांचे लेखन करत होते. या पुस्तकांमध्ये छोटा राजनचे नकारात्मक चित्रण करण्यात आले होते. त्यामुळेच छोटा राजनने जे. डे यांची हत्या घडवून आणल्याचा दावा सीबीआयने शुक्रवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात केला आहे.
मिड-डे या दैनिकासाठी काम करणाऱ्या ज्योतिर्मय डे यांची ११ जून २०११ रोजी त्यांच्या पवई येथील अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली होती. या काळात जे.डे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील २० गँगस्टर्सवर आधारित दोन पुस्तकांचे लेखन करत होते. त्यापैकी एका पुस्तकाचे नाव ‘चिंधी रॅग्स टू रिचेस’ असे होते. हे पुस्तक साधारण ३०० पानांचे होते. तर दुसरे पुस्तक हे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात दाऊदचा उदय कसा झाला, यावर आधारित होते. एका सामान्य तस्करापासून ते आंतराष्ट्रीय डॉनपर्यंतचा त्याचा प्रवास ‘विदाऊट फायरिंग सिंगल बुलेट’ या पुस्तकात मांडण्यात आला होता. या पुस्तकात दाऊदची व्यक्तिरेखा छोटा राजनपेक्षा वरचढ ठरेल, अशा पद्धतीने रंगवण्यात आली होती. या गोष्टीचा छोटा राजनला राग होता, अशी माहिती तपासाधिकाऱ्यांनी आरोपपत्रात नमूद केली आहे.
छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार तुरूंगात आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात त्याला बाली येथे अटक करण्यात आली होती. जे.डे. यांनी मिड-डे दैनिकात असताना राजनविषयी बदनामीकारक लिखाण केले होते, असा दावाही सीबीआयकडून करण्यात आला आहे. सीबीआयकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राच्या ५० पानी संक्षिप्त अहवालात याविषयीचा उल्लेख आहे.  २० गँगस्टर्सवर आधारित पुस्तकामध्ये जे.डे. यांनी छोटा राजनने परिधान केलेला देशभक्तीचा खोटा मुखवटा दूर करण्याचा प्रयत्न केला होता.