‘तुम्हाला हवी असणारी शक्ती आणि धैर्य तुमच्यातच दडले आहे. त्यातून आपले भविष्य घडवा’, असे स्वामी विवेकानंदांचे वचन नमूद करीत आज संसदेत आपला आठवा अर्थसंकल्प सादर करणारे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम मोरारजी देसाई यांच्यापाठोपाठ सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे दुसरे अर्थमंत्री ठरले. पण पावणेदोन तासांनंतर १८८ मुद्दय़ांचा समावेश असलेले त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपले तेव्हा त्यांच्या अर्थसंकल्पातून आगामी वित्तीय वर्षांत देशाला काय मिळणार, या प्रश्नाचे उत्तर खच्चून भरलेल्या लोकसभेतील बहुतांश सदस्यांना लगेच मिळत नव्हते. जगभर आर्थिक मंदीचे ढग दाटले असताना १२१ कोटी लोकसंख्येच्या भारताला कठीण समयी देशांतर्गत मागणी-पुरवठय़ाच्या जोरावरच भारतीय अर्थव्यवस्थेला अस्तित्वाचा लढा द्यावा लागेल, असेच कदाचित विवेकानंदांच्या वचनातून चिदम्बरम यांना सुचवायचे असेल.
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने चिदम्बरम लोकानुनय करणाऱ्या घोषणांची बरसात करून सत्ताधारी यूपीएच्या विरोधकांना नामोहरम करतील, असाच गाजावाजा करण्यात येत होता. पण झाले नेमके उलटे. चिदम्बरम यांच्या आठव्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांची निराशा केली. एरवी लहानसहान मुद्दय़ांवर गोंधळ घालून कुरघोडी करण्यासाठी टपून बसलेल्या सदस्यांनाही चिदम्बरम यांच्या भाषणातून रोष व्यक्त करण्यासाठी फारसे काही मिळाले नाही. पंतप्रधान ग्रामसडक योजनेचा ज्या राज्यांनी पुरेपूर वापर करून घेतला, अशा राज्यांना लाभ देण्यासाठी दुसरा टप्पा सुरू करण्याचा प्रस्ताव चिदम्बरम यांनी मांडला तेव्हा गोंधळ घालणारे सरसावले. पण हा गोंधळही अल्पजीवी ठरला.
प्रचंड गाजावाजा करण्यात आलेला हा अर्थसंकल्प मांडण्यासाठी चिदम्बरम आपली लाल बॅग घेऊन सभागृहात अगदी शेवटच्या क्षणी पोहोचले. मीराकुमार यांनी घोषणा केल्यावर त्यांनी शर्टाला मायक्रोफोन लावला. पुढय़ात वर लोकसभा अध्यक्षांच्या गॅलरीत स्थानापन्न झालेल्या आपल्या कुटुंबातील सदस्यांवर ओझरता कटाक्ष टाकून भाषणाला सुरुवात केली. अर्थमंत्री म्हणून यापूर्वीच्या कारकिर्दीला सभागृहातील सर्व सदस्य आणि देशवासीयांनी केलेल्या समर्थनाबद्दल चिदम्बरम यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आभार मानले आणि साधे, सरळ व छोटे भाषण करण्याचा इरादा व्यक्त केला.
चिदम्बरम लोकसभेत शेवटच्या क्षणी दाखल झाले असले तरी त्यांची आई, पत्नी नलिनी, पुत्र कार्तिक, स्नुषा श्रीनिधी आणि एक किशोरवयीन मुलगी असे पाच जण अर्धा तास आधीच पोहोचले होते. संसद भवनाच्या प्रवेशद्वारापुढे जमलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले.
चिदम्बरम यांच्या धडाकेबाज अर्थसंकल्पाच्या कुतूहलापोटी राज्यसभा गॅलरी डॉ. स्वामिनाथन, मुरली देवरा, प्रा. रामगोपाल यादव, नरेश अग्रवाल, डेरेक ओब्रायन, चौधरी वीरेंद्र सिंह, सुब्बीरामी रेड्डी आदी राज्यसभा सदस्यांनी भरून गेली होती. महिलेला केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आला असला तरी रजनी पाटील यांच्यासह केवळ दोनच महिला राज्यसभा गॅलरीत होत्या.
सभागृहात डॉ. मुरली मनोहर जोशी, शाहनवाझ हुसैन, वासुदेव आचार्य, विलास मुत्तेमवार आदी सदस्य चिदम्बरम यांच्या भाषणातील मुख्य अंशांचे टिपण काढत होते. ‘ठाम इच्छाशक्ती आणि सजग मन:स्थितीनिशी नजरेला जी गोष्ट योग्य वाटते, ती पूर्ण व्हायला हवी’ या आपले आवडते संत कवी थिरुवल्लुवर यांच्या ओळींचा आधार घेत आमचे काम आमच्या कृतीतून झळकेल, असा विश्वास चिदम्बरम यांनी व्यक्त केला.
‘समता नैतिकदृष्टय़ा बाध्य असली तरी शाश्वत विकासासाठीही ती आवश्यक आहे. कुठल्याही देशासाठी सर्वात महत्त्वपूर्ण स्रोत हे त्याचे नागरिक असतात,’ हे नोबेल पुरस्कार विजेते जोसेफ स्टीगलित्झ यांचे वाक्यही त्यांनी सुरुवातीला उद्धृत केले. पण चिदम्बरम यांचे भाषण संपले तरी हा सर्वात महत्त्वपूर्ण स्रोत जोपासण्यासाठी अर्थसंकल्पात नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या, याचा बोध बहुतांश सदस्यांना झाला नव्हता. अर्थसंकल्प सादर करण्याचा सोपस्कार आटोपताच चिदम्बरम शर्टाचा मायक्रोफोन तत्परतेने काढून वेगाने विरोधी पक्षांच्या बाकांकडे गेले. त्यांनी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांचे हस्तांदोलन करून आभार मानले आणि अडवाणी, राजनाथ सिंह, गोपीनाथ मुंडे, मुरली मनोहर जोशी, मुलायमसिंह यादव यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर ते पुन्हा आपल्या आसनावर पोहोचले आणि सोनिया गांधींशी चर्चा केली. सोनिया गांधी आणि पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अर्थसंकल्पातून आम आदमी बेपत्ता’
सुषमा स्वराज (लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या)
चिदम्बरम यांच्या अर्थसंकल्पातील वस्तुस्थिती दुसऱ्या दिवशीच लक्षात येते. ते इतके सफाईने ‘पॉलिश’ करतात की, त्याची कल्हई उतरायला २४ तास लागतात.  महिला, तरुण आणि गरिबांविषयी अर्थसंकल्पात काहीही नाही. महिलांसाठी बँक बनविली, युवकांसाठी रोजगाराची चर्चा नाही. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. केवळ थेट लाभार्थीना हस्तांतरणाची गोष्ट आहे. अर्थसंकल्पातून आम आदमी बेपत्ता आहे.

‘ठाम इच्छाशक्ती आणि सजग मन:स्थितीनिशी नजरेला जी गोष्ट योग्य वाटते, ती पूर्ण व्हायला हवी, आमच्या सरकारचे काम कृतीतून झळकेल.’
– पी. चिदम्बरम

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chidambaram walks tight rope levies tax on super rich
First published on: 01-03-2013 at 02:34 IST