Chief Election Commissioner Dnyanesh Kumar Press Conference : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका करत मतदान प्रक्रियेत घोळ झाल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी काही पुराव्यांचं सादरीकरण केलं होतं. त्यांच्या आरोपांमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपानंतर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने जोरदार टीका केली. तसेच अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?

“सर्व मतदार, राजकीय पक्ष आणि बूथ-स्तरावरील अधिकारी पारदर्शकपणे काम करत आहेत. राजकीय पक्षांच्या या प्रतिनिधींचा आवाज त्यांच्या पक्षांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचत नाही किंवा चुकीची माहिती पसरवण्याच्या प्रयत्नात बूथ स्तरावरील वास्तवाकडे दुर्लक्ष केलं जातं ही चिंतेची बाब आहे”, असं मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटलं.

“मतदार यादीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये म्हटलं होतं की यामुळे मतदारांच्या गोपनीयतेचं भंग होऊ शकतो. पण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, निवडणूक आयोगाने कोणत्याही मतदाराचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करावे का?”, असा सवालही मुख्य निवडणूक आयुक्तांनी केला.

“लोकसभा निवडणुकीसाठी १ कोटींहून अधिक अधिकारी, १० लाखांहून अधिक बूथ-लेव्हल एजंट आणि २० लाखांहून अधिक मतदान एजंट काम करतात. मग एवढ्या लोकांसमोर आणि इतक्या पारदर्शक प्रक्रियेत कोणी मतं चोरू शकतं का? तसेच आणखी काही आरोप झाले, त्यावर आम्ही पुरावे मागितले. मात्र, आम्हाला काहीही पुरावे दिले नाहीत. राजकीय कारणांसाठी मतदारांना लक्ष्य केलं जात असलं तरी आम्ही कोणताही भेदभाव न करता सर्व मतदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत”, असंही निवडणूक आयुक्तांनी म्हटलं आहे.

‘हा भारतीय संविधानाचा अपमान…’

राहुल गांधींच्या मतदान चोरीच्या आरोपांना उत्तर देताना निवडणूक आयोगाने राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. काही नेते मतदारांची दिशाभूल करत असल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. मात्र, “आम्ही आमच्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. मतचोरी सारख्या चुकीच्या शब्दाचा वापर केला गेला. पण जनतेला भ्रमित करण्याचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. तसेच हा भारतीय संविधानाचा अपमान नाही तर काय आहे?”, असा सवालही निवडणूक आयोगाने केला.

‘निवडणूक आयोग खोट्या आरोपांना घाबरत नाही’

“काहींनी वेगवेगळे आरोप केले. त्यानंतर आम्ही पुरावे मागितले तर कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. मात्र, निवडणूक आयोग अशा खोट्या आरोपांना घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून मतदारांना लक्ष्य करत अशा प्रकारचं राजकारण केलं जात आहे. मात्र, निवडणूक आयोग स्पष्ट करू इच्छित आहे की गरीब, श्रीमंत किंवा तरुण आणि महिला या सर्व मतदारांच्या पाठिमागे निवडणूक आयोग खंबीरपणे उभे आहे”, असं निवडणूक आयोगाने म्हटलं.