नवी दिल्ली : बुट फेकण्याच्या प्रकारामुळे धक्का बसला होता. पण आता ही घटना विस्मृतीत गेली आहे, अशी टिप्पणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायकक्षात खंडपीठातील इतर न्यायाधीशांशी झालेल्या संवादादरम्यान केली. सर्वोच्च न्यायालयाने २०२५ मध्ये पर्यावरणक्षेत्रातील स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर केंद्र सरकारची अधिसूचना रद्द केली होती. त्याविरोधात फेरआढावा याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात सरन्यायाधीश गवई, न्या. उज्जल भूईया व न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी बुटफेक प्रकरणावर टिप्पणी केली. न्या. भूईया यांनी हा प्रकार गंभीर असून फक्त सरन्यायाधीशांचाच अपमान झाला असे नव्हे तर न्यायव्यवस्थेचीही अप्रतिष्ठा झाली, असे मत व्यक्त केले.
बुटफेक करणारे राकेश किशोर सर्वोच्च न्यायालयातील वकील आहेत. सनातन धर्माचा अपमान होऊ देणार नाही, असा आरडाओरडा करत किशोर यांनी सरन्यायाधीश गवईच्या दिशेने बुट फेकला होता. किशोर यांची सनद बार कौन्सिलने रद्द केली आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायकक्ष क्रमांक-१ मध्ये सोमवारी सुनावणीदरम्यान झालेल्या या धक्कादायक घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी झाल्याप्रकाराकडे दुर्लक्ष करून सुनावणी सुरू ठेवण्याचा आदेश वकिलांना दिला होता.
माझ्यातील भगतसिंग जागा- लंके
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी गुरुवारी राकेश किशोर यांनी भेट घेऊन निषेध केला. लंके यांनी त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व संविधानाची प्रत भेट दिली. ज्या संविधानाने किशोर यांची प्रगती झाली, त्याचाच त्यांना विसर पडला आहे. ‘‘मी त्यांच्याकडे जाताना गांधीवादी भूमिका घेऊन गेलो होतो, पण तिथे गेल्यावर माझ्यातील भगतसिंग जागा झाला’’, अशी प्रतिक्रिया लंकेंनी भेटीनंतर दिली. ‘मी त्यांना सांगितले की, तुमचे कृत्य चुकीचे आहे. हा देश संविधानावर चालतो. त्यावर, देश संविधानावर नाही तर जातीपातीवर चालतो, असे ते मला म्हणाले’, असा दावा लंके यांनी केला.