China asks US to withdraw Typhon missile : चीन आणि अमेरिका यांच्यात टॅरिफच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान चीनने मंगळवारी अमेरिकेला त्यांनी जपानमध्ये तैनात केलेली टायफन (Typhon) ही मिड-रेंज क्षेपणास्त्र प्रणाली मागे घेण्यास सांगितले आहे. प्रादेशिक धोरणात्मक सुरक्षेसाठी ही प्रणाली धोका असल्याचे चीनने म्हटले आहे.

चिनी पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, चीनच्या गंभीर चिंतेकडे दुर्ल७ करत अमेरिका आणि जापान यांनी संयुक्त लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये मिड-रेंज क्षेपणास्त्र प्रणाली टायफन तैनात केली.

“चीन या कृतीचा तीव्र निषेध आणि ठामपणे विरोध करतो. आशियाई देशांमध्ये अमेरिकेने टायफन मीडियम रेंज मिसाईल सिस्टम तैनात केल्याने कायदेशीर सुरक्षा हितसंबंधाना तडा जात असून यामुळे प्रादेशिक शस्त्रास्त्र स्पर्धा आणि लष्करी संघर्ष याबरोबरच प्रादेशिक धोरणात्मक सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले.

अमेरिका आणि जपान यांनी इतर देशांच्या सुरक्षेसंबंधी चिंतांचा आदर करण्याची गरज आहे आणि त्यांनी प्रादेशिक शांतता आणि स्थिरता यासाठी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे, उलट नाही, असेही ते म्हणाले.

“चीन अमेरिका आणि जपान यांना प्रादेशिक देशांच्या इशार्‍याकडे लक्ष देण्याची, तसेच चुकीची कृती दुरूस्त करून टायफन क्षेपणास्त्र प्रणाली लवकरात लवकर मागे घेण्याची विनंती करतो, असेही चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले.

यापूर्वी चीनने फिलिपिन्स येथे टायफन सिस्टम तैनात करण्यावर आक्षेप घेतला होता, येथे तीन आणि मनिला यांच्यात साऊथ चाइना सीवरून वाद सुरू आहे.

ही क्षेपणास्त्र प्रणाली काय आहे?

अमेरिकन लष्कराने सोमवारी पहिल्यांदाच जपानमध्ये मध्यम रेंज टायफन क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. अमेरिकाने यापूर्वी ही प्रणाली दक्षिण चिनी सागरात फिलिपिन्समध्ये तैनात केली आहे. ऑस्ट्रेलिया देखील याचा वापर करतो.

रिपोर्टनुसार, टायफन क्षेपणास्त्र प्रणाली टॉमहॉक क्रूज मिसाईल आणि स्टंडर्ड मिसाईल (SM-6) इंटरसेप्टर्स लाँच करू शकते, जे तीनच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत आणि रशियाच्या काही भागात हल्ला करू शकते. हा अमेरिकेच्या फर्स्ट आयलंड चेन रणनीतीचा भाग मानला जातो, ज्याअंतर्गत जपान, फिलिपिन्स आणि इतर ठिकाणांच्या माध्यमातून चीनचे नौदल आणि हवाई दलाला मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.