पीटीआय, संयुक्त राष्ट्रे

मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्यातील सहभागाबाबत भारताला पाहिजे असलेला आरोपी आणि पाकिस्तानातील लष्कर ए तैयबाचा दहशतवादी साजीद मीर याला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करावे, यासाठी भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त राष्ट्रांत मांडलेला प्रस्ताव मंगळवारी चीनने अडविला.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा निर्बंधांनुसार मीर याला काळय़ा यादीत टाकून जागतिक दहशतवादी घोषित करावे, असा प्रस्ताव अमेरिकेने भारताच्या अनुमोदनासह मांडला होता. तो मंजूर झाला असता तर, मीर यांची मालमत्ता गोठवून त्याच्यावर प्रवासबंदी लादून त्याच्या शस्त्रास्त्र व्यापाराला आळा घालता आला असता. पण चीनने त्यात खोडा घातला. चीनने आधी हा प्रस्ताव प्रलंबित ठेवल्याचे सप्टेंबरमध्ये स्पष्ट झाले होते. पण आता चीनने त्याला नकार दिला आहे.