पीटीआय, बीजिंग : पाश्चिमात्य देश चीनच्या विकासाची गळचेपी करत आहेत आणि अमेरिका त्यांचे नेतृत्व करत आहे, असा आरोप चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी केला. यामुळे चीनच्या विकासामध्ये अभूतपूर्व आव्हाने उभी राहिली आहेत, असा दावा त्यांनी केला. या देशांनी चहूबाजूंनी चीनवर प्रतिबंध टाकून गळचेपी केली आहे, असे जिनपिंग म्हणाले.

चीनमध्ये सध्या वार्षिक संसदीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रामध्ये बोलताना जिनपिंग यांनी अमेरिकेवर टीकास्त्र सोडले. भविष्यात चीनसमोरील जोखमी आणि आव्हाने वाढत जातील, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. सध्या अमेरिका जगातील पहिल्या, तर चीन दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. दोन्ही देशांदरम्यान काही काळापासून व्यापारयुद्ध सुरू आहे. अमेरिकेने ह्युवेई या तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढय़ कंपनीविरोधात कठोर कारवाई केली आहे. त्याच्या जोडीला अमेरिका आणि युरोपीय महासंघाने फोनवरील डेटा संरक्षणाचे कारण पुढे करून टिकटॉक या चिनी अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

अर्थव्यवस्थेची वाढ करताना अमेरिकेवरील अवलंबत्व कमी करण्याचा चीनचा प्रयत्न आहे. त्यासाठी रणनीती आखणे हा या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरील प्रमुख विषय आहे. त्या दृष्टीने चीनच्या सरकारने संशोधन आणि विकासावरील निधीची तरतूद २ टक्क्यांनी वाढवून ४७ अब्ज डॉलर इतकी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या वर्षांच्या अर्थसंकल्पात संशोधन आणि विकासासाठी २,००० कोटी रुपयांची (सुमारे २४.४४ कोटी डॉलर) तरतूद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ध्येयावर लक्ष केंद्रीत करा’

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर मोठय़ा प्रमाणात आणि गुंतागुंतीचे बदल होत आहेत, अशा वेळी आपण शांत राहिले पाहिजे, आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि स्थैर्य कायम राखताना प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, असे आवाहन क्षी जिनपिंग यांनी केले.