जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. लोकसंख्या कमी व्हावी, यासाठी चीन धोरणे आखत होता. त्याचे परिणाम म्हणून मागच्या वर्षीपासून चीनच्या लोकसंख्या वाढीमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे. ही घट १९६१ नंतर पहिल्यांदाच झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार २०२२ च्या अखेर चीनची लोकसंख्या १४१ कोटी ११ लाख ७ हजार ५०० एवढी नोंदवली गेली आहे. तर त्याच्या आधीच्या वर्षी नोंदवली गेलेली लोकसंख्या ही १४१ कोटी २६ लाख एवढी होती. तसेच २०२२ रोजी प्रति १००० लोकांमध्ये जन्मदर हा ६.७७ टक्के एवढाच राहिला. जो आधीच्या २०२१ या वर्षी प्रति हजार ७.५२ टक्के एवढा होता. २०२१ च्या तुलनेत २०२२ मधील जन्मदर हा आतापर्यंतचा सर्वात कमी जन्मदर असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय चीनने १९७६ नंतर पहिल्यांदाच सर्वात अधिक मृत्यूदर नोंदविला आहे. २०२१ मध्ये प्रति हजार लोकांमागे ७.१८ टक्के असलेला मृत्यूदर आता वाढून तो ७.३७ टक्के एवढा झाला आहे. सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार घसरलेल्या जन्मदराला एक अपत्य धोरण कारणीभूत असावे, असा अंदाज बांधला गेला आहे. १९८० पासून ते २०१५ पर्यंत एक अपत्य धोरण चीनने राबविले होते. तसेच उच्च शिक्षण महाग झाल्यामुळे लोकांमध्ये दोन किंवा एक अपत्य जन्माला घालण्यास निरुत्साह दिसला. २०२१ पासून चीनने पुन्हा एकदा लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी करामध्ये सूट, प्रसूती रजेमध्ये वाढ, घर घेण्यासाठी अनुदान देणे अशा योजनांची सुरुवात करण्यात आली आहे.

भारताचीही लोकसंख्या १४१ कोटींवर

चीन आणि भारताच्या लोकसंख्येची नेहमीच तुलना होत असते. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना होत असते. मात्र २०२१ रोजी करोनाच्या प्रादुर्भावामुळे जनगणना होऊ शकलेली नाही. २०११ साली जी जनगणना झाली त्यामध्ये भारताची लोकसंख्या १२१ कोटी एवढी होती. त्यानंतरच्या १२ वर्षांत लोकसंख्येत वाढ झालेली आहे. worldometers या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार भारताची आताची लोकसंख्या ही १४१ कोटी ५२ लाख एवढी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनामुळे एक महिन्यात ६० हजार मृत्यू

लोकसंख्येबाबत चीनला दिलासा मिळाला असला तरी करोनोच्या नव्या लाटेमुळे चीनचे कंबरडे मोडले आहे. शून्य करोना धोरण राबविल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये चीनने निर्बंधात शिथीलता आणली आणि त्यानंतर पुन्हा एकदा देशात करोनाचा प्रताप दिसू लागला. गेल्या ३५ ते ४० दिवसांत चीनमध्ये अधिकृत ६० हजार लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.