चीनच्या एका मच्छीमाराने प्रत्यक्षात ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटातील प्रसंग अनुभवला; त्याची ही गोष्ट थरारक अशीच आहे. चीन-रशिया सीमेवर ईशान्येकडील हेलाँगजियांग प्रदेशात या मच्छीमाराला हा अनुभव आला.
फुयुआन परगण्यातील झांग मिंगयू याने वुसुली नदीत ११ जूनच्या सकाळी प्रवास करताना काहीतरी पोहताना पाहिले, त्या वेळी तो सानजियांग नेचर रिझर्वमध्ये चालला होता. मिंगयू याला प्रथम असे वाटले की, ते हरीण पोहत असावे,मात्र तो प्राणी अचानक वळला आणि त्याने डरकाळी फोडली. नंतर तो प्राणी त्याच्या बोटीची एक बाजू पकडू लागला. त्याला पाहून आपण घाबरलो,  खरेतर अंग थरथरत होते कारण शेवटी बघितले तेव्हा काळ्या पिवळ्या पट्टय़ांचा तो वाघ होता, असे मिंगयू सांगतो. त्याने वाघाच्या वाटेला न जाण्याचे ठरवले पण तो बोटीत चढणार नाही याचीही काळजी घेतली. जीवनाचा हा संघर्ष असा चालू होता. वाघाने बोटीत चढण्याचा प्रयत्न केला. हा नको असलेला पाहुणा येऊ नये यासाठीच त्याचे प्रयत्न होते. दुसऱ्या बाजूने आपण त्याला मागे ढकलले. वाघाने तरीही प्रयत्न सोडले नाहीत. नंतर दमून त्याने प्रयत्न सोडून दिले व पोहायला लागला. झांग याने त्याची दहा मिनिटांची व्हिडिओ मोबाईलवर घेतली असून त्यात वाघ नदीत पोहोताना दिसत आहे, नंतर तो किनाऱ्याला लागला. त्याचे पंजे वाळूत उमटलेले दिसत आहेत. हा अनुभव लाइफ ऑफ पाय चित्रपटासारखाच होता. त्यासाठी अँग ली यांना दिग्दर्शनाचे ऑस्कर मिळाले होते. सानजियांग नेचर रिझव्‍‌र्हचे प्रसिद्धी अधिकारी वू झिफू यांनी ती व्हिडीओ फेलाइन रीसर्च सेंटरला पाठवली आहे. रिझर्व म्हणजे अभयारण्याने एक पथक तेथे पाठवले आहे. व्हिडिओ व पायांचे ठसे बघता तो जंगली सायबेरियन वाघ होता. सायबेरियन वाघ हा जगातील एक दुर्मीळ सस्तन प्राणी असून तो पूर्व रशिया, ईशान्य चीन व कोरियन द्वीपकल्पाच्या उत्तर भागात राहतो. आता केवळ ५०० सायबेरियन वाघ उरले आहेत.