नवी दिल्ली : चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे सोमवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली. या दौऱ्यात ते मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मोदी यांना भेटण्यापूर्वी वांग यी हे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. वांग यांचे सोमवारी दुपारी ४.१५ वाजता दिल्लीमध्ये आगमन होईल. त्यानंतर ते संध्याकाळी सहाच्या सुमाराला जयशंकर यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. तर वांग आणि डोभाल यांच्यादरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजता चर्चा होणार आहे. संध्याकाळी ५.३० वाजता ते ७ लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी त्यांची भेट घेतील. या चर्चांमध्ये दोन्ही बाजूंकडून सीमा परिस्थिती, व्यापार आणि विमान सेवा सुरू करणे यासारख्या विविध महत्त्वाच्या मुद्दे उपस्थित होतील असे मानले जात आहे.

गलवान खोऱ्यात २०२० साली दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या तीव्र संघर्षानंतर संबंध पुन्हा सुरळीत करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून वांग यी यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. सीमेवर शाश्वत शांतता राखण्यासाठी परस्पर विश्वास वाढवण्यासाठी उपाययोजनांवरही चर्चा होईल असे संबंधितांनी सांगितले.

आयातशुल्क आणि वांग यांचा दौरा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर ५० टक्के आयातशुल्क लादल्यामुळे भारत आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांचा प्रस्तावित चीन दौरा आणि वांग यांचा भारताचा दौरा यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.