भारताच्या स्वातंत्र्याला ७३ वर्ष पूर्ण झाली. त्यामित्तानं आज देशात उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि १३० कोटी देशवासीयांना अनेक राष्ट्रांनी शुभेच्छा दिल्या. यादरम्यान, चीननंही भारताला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चीनचे भारतातील राजदूत सुन विडोंग यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

“भारत सरकार आणि देशातील जनतेला स्वांतंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचीन वारसा असलेले भारत आणि चीन हे दोन महान देश शांततामय मार्गानं आणि परस्पर सहकार्यानं प्रगती करतील अशी अपेक्षा आहे,” असं मत चीनचे भारतातील राजदून सुन विडोंग यांनी व्यक्त केलं. भारतातील अन्य देशांच्या राजदुतांनीदेखील भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीदेखील भारताला शुभेच्छा दिल्या. “माझे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या सर्व देशवासीयांना आनंदित करणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,” असं म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा- ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’

पंतप्रधानांनी साधला होता चीनवर निशाणा

“LoC पासून LAC पर्यंत, ज्यांनी कोणी भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले, त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळाले. भारताच्या संप्रभुतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देशामध्ये जोश भरलेला आहे” असं मोदी म्हणाले होते. दहशतवाद असो किंवा विस्तारवाद भारत ठामपणे त्याचा मुकाबला करत आहे असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता चीन-पाकिस्तान दोघांना टोला लगावला. शांतता आणि सौहार्दासाठी भारताचे जितके प्रयत्न आहेत, तितकाच भारत मातृभूमीच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १८४ देशांनी यूएनमधील आपल्या दाव्याचे समर्थन केले याकडे मोदींनी लक्ष वेधले. देश मजबूत आणि आत्मनिर्भर असेल तेव्हाच हे शक्य होत असल्याचंही मोदी म्हणाले.