कोणत्याही परदेशी नेत्याने तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांना भेटून आमच्या अंतर्गत कारभारात ढवळाढवळ करू नये, असे सांगत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व दलाई लामा यांच्या संकल्पित भेटीस चीनने तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, बीजिंगच्या या इशाऱ्यावर ‘व्हाइट हाऊस’ने टीका केली असून याआधीही उभय नेते भेटले आहेत आणि आताही होणाऱ्या या भेटीत काही विशेष संभवत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तिबेटचा मुद्दा पुढे करून कोणत्याही देशाने अथवा सरकारने आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये, असे चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते हाँग ली यांनी सोमवारी स्पष्ट केले.
ओबामा व लामा हे यांची येत्या गुरुवारी न्यूयॉर्क येथे राष्ट्रीय प्रार्थनासभेत भेट होणार असून त्या सभेत ओबामा यांचे भाषणही आयोजित करण्यात आले आहे. तिबेटच्या मुद्दय़ांसंबंधी दिलेल्या आश्वासनाचे पालन करून अमेरिकेने उभय देशांचे द्विपक्षीय संबंध सुरळीत राहण्याच्या दृष्टीने वर्तन करणे एकूणच हितकारक ठरणार आहे, असेही मत हाँग ली यांनी मांडले.
चीनच्या अंतर्गत कारभारात होणाऱ्या कथित हस्तक्षेपाचा सरकारी अखत्यारीतील वृत्तपत्राने सोमवारी निषेध केला असून ओबामा यांनी लामा यांची भेट घेतली तर ते योग्य ठरणार नाही आणि चीन व अमेरिका यांच्यातील संबंधांवर त्याची सावलीही पडेल, असा इशारा या वृत्तपत्राने दिला आहे. तिबेटला चीनपासून अलग करण्याचा दलाई लामा यांचा प्रयत्न असून ओबामा हे त्यास खतपाणी घालीत आहेत, असाही आरोप या वृत्तपत्राने केला.