पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या SCO बैठकीच्या निमित्ताने चीन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा केली. बैठकीनंतर शी जिनपिंग यांनी पंचशील तत्त्वांचा पुनरुच्चार करून त्याचा पुरस्कार करण्याची भूमिका मांडली. यानंतर SCO बैठकीदरम्यानदेखील दोन्ही नेते एकमेकांना भेटले. त्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचीही भेट घेतली. चीनमधल्या मोदींच्या दौऱ्यादरम्यान ते एका अत्याधुनिक कारमधून प्रवास करत होते. ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या ताफ्यातील त्यांची आवडती कार आहे. ती त्यांनी मोदींना प्रवासासाठी उपलब्ध करून दिली होती.

चीनची Hongqi L5 लिमोझिन!

Hongqi L5 ही लिमोझिन कार शी जिनपिंग यांच्या स्टेट कार्सच्या ताफ्यातील एक कार आहे. चीन सरकारमधील काही अतीवरीष्ठ नेते व आंतरराष्ट्रीय प्रमुखांसाठी ही कार राखीव आहे. २०१९ साली भारत दौऱ्यावर आलेले शी जिनपिंग पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी महाबलीपुरम येथे याच कारमधून आले होते!

Hongqi या शब्दाचा उच्चार चीनी पद्धतीने ‘हाँगची’ असा केला जातो. या शब्दाचा अर्थ ‘लाल झेंडा’ असा आहे. या कारची सेवा चीनची सरकारी कंपनी फर्स्ट ऑटोमोबाईल वर्क्स ग्रुपकडून पाहिली जाते. ही चीनमधील सर्वात जुनी कार कंपनी आहे. १९५८ साली ही कंपनी स्थापन झाली. Hongqi L5 ही पूर्णपणे चीनी बनावटीची कार असून अनेक चीनी उच्चभ्रू व्यक्तींमध्ये राष्ट्रीय प्रतिष्ठेचा भाग म्हणून ही कार बाळगली जाते.

फक्त कम्युनिस्ट नेत्यांसाठीच केली होती सुरू!

Hongqi L5 ही कार सुरुवातीला फक्त कम्युनिस्ट नेत्यांसाठीच सेवेत आणण्यात आली होती. १९८१ साली हाँग-ची कार्सचं उत्पादन कंपनीने थांबवलंदेखील होतं. पण ९० च्या दशकात ते पुन्हा सुरू करण्यात आलं. या कार्सचं L5 हे मॉडेल सर्वात लोकप्रिय ठरलं आहे.

Hongqi L5 कारची वैशिष्ट्ये…

  • या कारचं V12 हे इंजिन ४०० हॉर्सपॉवरपर्यंत ताकद निर्माण करू शकते.
  • ही कार १०० किमी प्रतितास इतका वेग अवघ्या ८.५ सेकंदांत गाठू शकते. या कारचा सर्वाधिक वेग हा २१० किमी प्रतितास इतका आहे.
  • Hongqi L5 कारची लांबी ५.५ मीटर म्हणजे जवळपास १८ फूट आणि वजन जवळपास ३ टनांहून अधिक आहे.
  • कारच्या आतल्या भागात बसण्यासाठी पुरेशी जागा, उंची चामड्याचे सीट कव्हर, लाकडी चौकटी आणि चीनच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष पटवून देणारं नक्षीकाम आहे.
  • कारच्या मागच्या सीटवर मसाज, स्टीम अशा सुविधा आहेत. त्यासोबतच टीव्ही स्क्रीनदेखील आहे.
  • ऑल व्हील ड्राईव्ह, सेंट्रलाईज क्रूज कंट्रोल, पार्किंग सेन्सर्स आणि ३६० अंशाचं कव्हरेज देणारे कॅमेरे कारवर बसवण्यात आले आहेत.
  • Hongqi L5 ची बाजारपेठेतील किंमत जवळपास ५० लाख युआन म्हणजे साधारण ७ कोटी रुपये इतकी असून ती चीनमध्ये उत्पादित होणारी सर्वात महाग कार आहे.

पहिली Hongqi CA72 ही कार १९८५ साली रस्त्यावर उतरली होती. १९६३ साली पुढचं मॉडेल CA770 बाजारात आलं. माओ झिदाँग यांनी हाँगची कार्सबद्दल सकारात्मक भूमिका मांडली होती. पण ते स्वत: या कारमध्ये फक्त एकदा निक्सन यांच्या १९७२ सालच्या चीन भेटीवेळी बसले होते.