Donald Trump Reciprocal Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका अनेक देशांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रम्प यांचं प्रशासन अनेक मोठे निर्णय घेत आहे. यामध्ये प्रामुख्याने नवीन टॅरिफ (आयात शुल्क) धोरणाचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांचे परिणाम जगभरातील शेअर बाजारातही पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर अखेर ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स (Reciprocal Tax) धोरणाला ९० दिवसांची स्थगिती दिली. मात्र, या निर्णयामधून चीनला वगळलं. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यातील ‘टॅरिफ वॉर’ आणखी तीव्र झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आता अमेरिकेने चीनवरील आयात कर २४५ टक्के लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधील ‘टॅरिफ वॉर’ आणखी भडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी चीनवर २४५ टक्के आयात कर लागू करण्याची घोषणा केल्यानंतर चीनच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व्हाईट हाऊसने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आतापर्यंत चीनवर लागू केलेला आयात कर अमेरिकेने तब्बल ८ पट वाढवला आहे.

दरम्यान, अमेरिका आणि चीनमधील या ‘टॅरिफ वॉर’वर आता चीनने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनवर २४५ टक्के आयात कर लागू करण्याच्या घोषणेवर चीनने पहिली प्रतिक्रिया देत टॅरिफबाबत महत्वाची भूमिका मांडली. ‘जर अमेरिका ‘टॅरिफ नंबर गेम’ खेळत राहिली तर ते त्यांच्याकडे लक्ष देणार नाही’, असं चीनने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त रॉयटर्सच्या हवाल्याने हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

अमेरिकेला चीन टॅरिफसंदर्भात देत असलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर चीनला आता २४५ टक्क्यापर्यंत आयात शुल्क आकारावं लागेल, या व्हाईट हाऊसच्या विधानाला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वरील टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता चीन अमेरिकेला पुन्हा टॅरिफने प्रत्युत्तर देण्याची शक्यता यावरून दिसत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन व्यापार करारांवर चर्चा करण्यासाठी ७५ हून अधिक देशांनी आधीच संपर्क साधला आहे. परिणामी या चर्चेदरम्यान सध्या काही देशांवरील आयतशुल्कबाबतचा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे. मात्र, यामधून चीन वगळण्यात आल्याचं अमेरिकेने नमूद केलं होतं. दरम्यान, ट्रम्प प्रशासन चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर कर लादत असल्याने याबाबत चीनने WTO कडे याबाबत तक्रार केली आहे. बीजिंगने म्हटलं की, “अमेरिकन शुल्क हे संपूर्ण जगाच्या विरोधात आहे आणि नियमांवर आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला गंभीर नुकसान करेल.”