चीन आणि अमेरिका या जागतिक स्तरावरील दोन प्रबळ सत्तांमध्ये तैवानच्या मुद्द्यावरून सुरू असलेला तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीयेत. हा तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यामध्ये नुकतीच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक पार पडली. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनांवरून हा वाद किंवा तणाव काही केल्या कमी होत नसल्याचंच समोर आलं आहे. या बैठकीनंतर अमेरिकेने तैवानच्या मुद्द्यावरून चीनला इशारा दिल्यानंतर आता चीननं थेट अमेरिकेलाच धमकावलं आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावतीने बैठकीनतर एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये बैठकीत चीनकडून मांडण्यात आलेल्या भूमिकेची माहिती देण्यात आली आहे. चीनमधील सरकारी माध्यम समूह असलेल्या शिहुआच्या हवाल्याने एनडीटीव्हीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

“अमेरिकेतील काही लोक तैवानचा वापर करून चीनवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं करणं फार गंभीर आहे. ही कृती म्हणजे आगीशीच खेळण्याचा प्रकार आहे. जे अशा आगीशी खेळत आहेत, ते जळून राख होतील”, अशा शब्दांत शी जिनपिंग यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच धमकी दिली आहे.

“चीन हल्ल्यासाठी पूर्णपणे सज्ज, २०२५मध्ये…”, तैवाननं दिला गंभीर इशारा!

मात्र याचवेळी, शी जिनपिंग यांनी एकत्र मिळून काम करण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे बिजिंगमध्ये बोलताना शी जिनपिंग यांनी जो बायडेन यांचा उल्लेख “माय ओल्ड फ्रेंड” असा केला. २००८ साली या दोघांमध्ये तत्कालीन सरकारचे प्रतिनिधी म्हणून पहिली भेट झाली होती. “आपल्याला एकत्र अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य आणि जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून चीन आणि अमेरिकेला परस्पर संवाद आणि सहकार्य वाढवणं आवश्यक आहे”, असं शी जिनपिंग यांनी म्हटलं आहे.

तैवानचा मुद्दा पेटला! जो बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना स्पष्टच सांगितलं; म्हणाले…!

अमेरिकेनं स्पष्ट केली भूमिका!

दरम्यान, एकीकडे चीनकडून अमेरिकेला धमकी दिली जात असताना दुसरीकडे अमेरिकेनं देखील जारी केलेल्या निवेदनात आपली भूमिका ठामपणे सांगण्यात आली आहे. “तैवानच्या मुद्द्यावरून राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करून सांगितली आहे. तैवानच्या पट्ट्यामध्ये अशांतता आणि अस्थैर्य निर्माण करण्याच्या कोणत्याही प्रयत्नाला अमेरिकेचा ठामपणे विरोध असेल”, असं जो बायडेन यांनी या बैठकीत शी जिनपिंग यांना स्पष्ट केल्याचं व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China president xi jinping warns president of america joe biden on taiwan issue pmw
First published on: 16-11-2021 at 15:02 IST