बीजिंग : चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे (सीपीसी) वार्षिक अधिवेशन ऑक्टोबरमध्ये होत असून त्यामध्ये नवीन पंचवार्षिक योजनेवर चर्चा होणार आहे. राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह पक्ष आणि देशाचे महत्त्वाचे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहतील. त्यामध्ये आर्थिक मुद्द्यांबरोबरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले आयातशुल्क युद्ध, टिकटॉकवर नियंत्रण मिळवण्याचे अमेरिकेचे प्रयत्न यावरही चर्चा अपेक्षित आहे.
जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या पॉलिट ब्युरोची बैठक झाल्यानंतर, सोमवारी या अधिवेशनाबद्दल अधिकृत निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली. त्यानुसार, बीजिंगमध्ये २० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या अधिवेशनाला देशभरातील ३७० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. चीनमध्ये महिन्याभरापूर्वी झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) शिखर परिषदेचे फलित हा मुद्दाही प्रामुख्याने चर्चिला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एससीओ’ परिषदेच्या निमित्ताने सात वर्षांनंतर चीनचा दौरा केला होता.
चीनची १५वी पंचवार्षिक योजना २०२६ ते २०३० या काळासाठी असेल. राष्ट्रीय पातळीवरील आर्थिक आणि सामाजिक विकास या योजनेच्या केंद्रस्थानी असेल. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनची अर्थव्यवस्था काही काळापासून मंदीचा सामना करत आहे. २० टक्क्यांवर गेलेला बेरोजगारीचा दर, ग्राहकोपयोगी वस्तूंचा देशांतर्गत खप कमी झाला आहे, विशेषतः विजेवर चालणाऱ्या वाहनांचे वाढलेले उत्पादन, अमेरिकेने लादलेल्या आयातशुल्काचा परिणाम आणि निर्यातबंदी या सर्व घटकांचा अर्थव्यवस्थेवर किती आणि कसा परिणाम होऊ शकतो यावर अधिवेशनात उहापोह होऊ शकतो. या सर्व समस्यांचा विचार करता, अलिकडील भाषणांमध्ये क्षी जिनपिंग भविष्याच्या दृष्टीने दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करत आहेत. पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याला राष्ट्रीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर, पुढील वर्षी मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’ला (एनपीसी) तो सादर केला जाईल.