China Reaction on India – Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी कारवाया वाढू लागल्यामुळे आशिया खंडात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता चीनची भूमिका समोर आली आहे. शनिवारी चीनच्या पराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना शांतता आणि संयम राखण्याचा सल्ला दिला. या वादातून शांततेत मार्ग काढा, असे आवाहन चीनने केले आहे. चीनच्या परराष्ट्र खात्याने म्हटले, “भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेल्या संघर्षावर आमची बारकाईने नजर आहे. वाढत्या तणावाबद्दल आम्हाला चिंता वाटत आहे.”

परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन आम्ही करत आहोत. तणाव वाढेल असे कृत्य करू नये. दोन्ही देशांनी शांतता, संयम राखण्यासाठी राजकीय मार्ग काढावा.

“भारत आणि पाकिस्तानचे मूलभूत अधिकार अबाधित राहावेत आणि भारतीय उपखंडात शांतता आणि स्थैर्य नांदावे. हेच आंतरराष्ट्रीय समुदायाला अपेक्षित आहे. हा तणाव संपुष्टात येण्यासाठी चीनला जे सहकार्य अपेक्षित आहे, ते करत राहू”, असे आवाहन चीनने केले आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २६ लोक मारले गेल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे कंबरडे मोडले. भारतीय हवाई दलाने तब्बल ९ ठिकाणी एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला. पाकिस्तानकडून गेल्या तीन दिवसांपासून सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. तसेच जम्मू-काश्मीरच्या सीमाभागातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि तोफांचा मारा करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीर ते गुजरातपर्यंतच्या २६ ठिकाणांवर ड्रोन हल्ला केला. पाकिस्तानने भारताचे हवाई तळ, विमानतळ, निवासी भागांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय लष्कराने हे हल्ले परतवून लावले.