नेपाळसारख्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांमध्ये घुसखोरी करण्यासाठी चीन घेतो भ्रष्ट नेत्यांची मदत; अहवालातून बाब उघड
गेल्या काही दिवसांपासून चीनवर करोना विषाणूच्या प्रसारावरून आरोप करण्यात येत होते. परंतु आता चीनवर एक नवा आरोप करण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांमध्ये घुसखोरी करण्यासाठी चीन भ्रष्ट नेत्यांची मदत घेत असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे. दरम्यान, चीननं नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांना लाच देऊन नेपाळमध्ये घुसखोरी केली आहे. तसंच चीनसोबत अनेक व्यवहारांमध्येही त्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचा आरोप ग्लोबल वॉच अॅनालिसिसनं आपल्या अहवालातून केला आहे. अहवालानुसार यामुळेच गेल्या काही वर्षांमध्ये ओली यांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाल्याचंही त्यात नमूद केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओली हे सत्तरच्या दशकापासून राजकारणात आहेत. परंतु काही वर्षांनी ते सक्रिय झाले. ते आतापर्यंत दोन वेळा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. आता त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी २०१५ मध्ये ओली यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या काही पक्षांनी सत्तेतून माघार घेतली आणि जुलै २०१६ मध्ये ओली यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळीदेखील ओली यांनी हे भारताचा कट असल्याचा आरोप केला होता. आपण नेपाळला आर्थिकदृष्ट्या बळकट करू इच्छित आहोत. परंतु भारत तसं होऊ देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला होता. परंतु तोपर्यंत नेपाळमध्ये चीननं गुंतवणुकीच्या बहाण्यानं आपले हातपाय पसरले होते.

ओली हे दुसऱ्यांदा फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यावेळी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ हा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यादरम्यान चीनची नेपाळमधील गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात वाढली आणि नेपाळच्या प्रति व्यक्ती उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यावर्षी १ जुलै रोजी जागतिक बँकेनं एक अहवाल सादर केला. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्न हे ९६० डॉलर्स होतं. परंतु २०१९ मध्ये ते वाढून १०९० डॉलर्स झालं. यामुळे नेपाळ गरीब देशांच्या यादीतून बाहेर आला. जर देशातील दरडोई उत्पन्न हे १०३६ डॉलर्सपेक्षा कमी असेल तर तो देश गरीब देश म्हणून गणला जातो.

काय म्हटलंय अहवालात?

चीनच्या गुंतवणुकीमुळे एकीकडे दरडोई उत्पन्न वाढलं असलं तरी दुसरीकडे पंतप्रधान ओली यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या अहवालानुसार त्यांचं एका स्विस बँकेतही खातं आहे. मिराबॉड बँकेच्या जिनेव्हा येथील शाखेत त्यांच्या खात्यात तब्बल ४१ कोटी रूपये जमा आहेत. तसंच या खात्यात असलेल्या रकमेमुळे ओली यांना दरवर्षी १.८७ कोटी रूपयांचा फायदा होत असल्याचंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

ग्लोबल वॉच अॅनालिसिसच्या अहवालानुसार ओली यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात म्हणजेच २०१५-१६ या कालावधीत कंबोडियातीस दुरसंचार क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली होती. तेव्हा नेपाळमधील चीनचे राजदून वू चुन्टाई यांनी ओली यांची मदत केली होती. हा व्यवहार ओली यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक अंग शेरिंग शेरपा यांच्यामार्फत करण्यात आला होता. या व्यवहारात कंबोडियाचे पंतप्रधान हू सेन आणि चीनचे अधिकारी बो जियांगेओदेखील सहभागी होते. यावर्षीही चीनची कंपनी जेटीईसोबत ४ जी नेटवर्कसाठी करार करण्यात आला. या प्रकल्पासाठी १ हजार १०७ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. ओली यांना यावरूनही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोधाचा सामना करावा लागला होता.

राहणीमान श्रीमंतांप्रमाणेच

काठमांडू पोस्टच्या एका माहितीनुसार ओली यांच्या गावी त्यांच्या जन्मदिनी सुट्टी जाहीर केली जाते. तसंच या दिवशी ओली आपल्या गावात मोठी पार्टीही आयोजित करतात. या सोहळ्यात नेपाळच्या आकारासारखा एक केकही मागवली जातो. त्या दिवशी ओली हे आपल्या हेलिकॉप्टरनं गावात हव्या त्या ठिकाणी जातात. तसंच केक कापताना मोठ्या प्रमाणात फुलांचा वर्षावही केला जातो. यावरही नेपाळमध्ये अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

करोनाकाळातही भ्रष्टाचाराचा आरोप

ओली यांच्यावर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. करोना काळातही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला होता. त्यांनी ६२१ कोटींना चीनकडून पीपीई किट आणि टेस्टिंग किट खरेदी केले होती. त्यापैकी बहुतांश खराब होते. तसंच त्यांची किंमतही अधिक होती. यावरून नेपाळमधील विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. या प्रकरणी नेपाळचे आरोग्यमंत्री आणि त्यांच्या ओली यांच्या निकटवर्तीयांविरोधात तपास सुरू आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: China uses corrupt leaders to make inroads into economically weaker countries like nepal report kp oli xi jinping jud
First published on: 14-07-2020 at 15:27 IST