एपी, क्यंगजू (दक्षिण कोरिया) : ‘‘चीन जागतिक मुक्त व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मदत करील,’’ अशी हमी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी शुक्रवारी दिली. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परिषदेला उपस्थित न राहता गुरुवारीच अमेरिकेला रवाना झाले.
दक्षिण कोरियातील क्यंगजू येथे परिषदेला शुक्रवारी सुरुवात झाली. या परिषदेला ट्रम्प-जिनपिंग भेटीची पार्श्वभूमी होती. जिनपिंग म्हणाले, ‘‘काळ जितका अधिक अस्थिर असतो, तितके सर्वांनी अधिक एकत्र येऊन काम करणे आवश्यक असते. जग सध्या वेगाने बदलत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती अधिकाधिक गुंतागुंतीची आणि स्फोटक होत चालली आहे.’’
चीनचे वर्चस्व असलेल्या पुरवठा साखळीमध्ये बदल घडवून आणण्याचे पाश्चिमात्य देशांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी पुरवठा साखळीतील स्थिरता कायम ठेवायला हवी, असे वक्तव्य केले. हरित ऊर्जा क्षेत्रात इतर देशांबरोबर काम करण्याची इच्छा जिनपिंग यांनी व्यक्त केली.
या परिषदेच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांनी जपानच्या पंतप्रधान सनाइ तकाइची, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली म्यंग यांचीही ते शनिवारी भेट घेतील.
‘‘परिषदेला अमेरिकेच्या वतीने मंत्री स्कॉट बेसंट उपस्थित होते. अमेरिकेचे विविध देशांबरोबरील व्यापारी संबंधांबाबत भूमिका ही परस्परयोग्य आणि समान व्यापार उद्दिष्टांच्या तत्त्वावर आधारलेली आहे,’’ अशी माहिती जिनपिंग यांनी दिली.
