अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे टॅरिफच्या माध्यमातून भारत, रशिया आणि चीनवर दबाव निर्माण करत असताना आता आशिया खंडात मोठी घडामोड घडत आहे. ग्लोबल साऊथ एकतेचे प्रतिक म्हणून लवकरच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे एकाच मंचावर दिसू शकतात. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेसाठी शी जिनपिंग यांनी दोन्ही नेत्यांना निमंत्रित केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यासह मध्य आशिया, आखाती देश, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील अनेक देशांच्या प्रमुखांनाही या परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान ही परिषद चीनच्या तिआनजिन शहरात होणार आहे.
२०२० साली गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सात वर्षांतील हा पहिलाच चीनचा दौरा ठरणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियात झालेल्या ब्रिक्स परिषदेत २०२४ साली शेवटचे एकत्र दिसले होते.
युक्रेन-रशिया युद्धानंतर रशियावर पाश्चिमात्य देशांनी निर्बंद लादले होते. तरीही ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र आणि शी जिनपिंग यांनी पुतिन यांच्याबरोबर मागच्या वर्षी ब्रिक्स परिषदेत सहभाग घेतला होता. रॉयटर्सने नवी दिल्लीतील रशियन दूतावासाच्या सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, या परिषदेत तीनही देशांमध्ये त्रिपक्षीय चर्चा होऊ शकते.
द चायना-ग्लोबल साउथ प्रोजेक्ट या संशोधन संस्थेचे मुख्य संपादक एरिक ओलँडर यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेनुसार, डोनाल्ड ट्रम्प हे जानेवारी महिन्यापासून चीन, इराण, रशिया आणि आता भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. शी जिनपिंग यांना शांघाय सहकार्य संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेच्या प्रभावापासून दूर असलेली आघाडी मजबूतपणे दाखविण्याची ही संधी आहे.
एरिक ओलँडर पुढे म्हणाले, ब्रिक्सने डोनाल्ड ट्रम्प यांना आधीच त्रास दिलेला आहे. त्यात आता हा एससीओ परिषदही होत आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याच्या कारणावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६ ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा केली. तसेच त्याआधी अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावले होते. त्यामुळे अमेरिकेकडून लावण्यात येणारे एकूण टॅरिफ ५० टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे याचा फटका भारताला बसत आहे. रशियाचे नाक दाबण्यासाठीच भारतावर टॅरिफ लादल्याची कबुली काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने दिली होती. चीनवरही ट्रम्प यांनी असाच अवाजवी टॅरिफ लावला होता. या सर्व पार्श्वभूमीवर भारत, चीन आणि रशिया एकाच मंचावर येण्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे.