कर्नाटकातील हिजाब प्रकरणासंदर्भात सुरु असलेला वाद सध्या भारतभर पसरत आहे. अनेक ठिकाणी लोक आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानुम यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये या मुद्द्यावरुन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिजाबला हात लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे हात कापले जातील असे सपा नेत्या रुबिना खानुम यांनी म्हटले आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी कर्नाटकातील काही शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीविरोधात निदर्शने केली. त्यावेळी खानुम यांनी हे वक्तव्य केले आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, “भारताच्या मुली आणि बहिणींच्या सन्मानाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्यांना झाशीची राणी आणि रजिया सुलतानासारखे बनण्यास वेळ लागणार नाही आणि त्याच्यां हिजाबवर हात घालणाऱ्यांचे हात कापले जातील,” असे म्हणत रुबिना खानुम यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. भारत हा विविधतेचा देश आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर टिळा किंवा पगडी किंवा हिजाब असला तरीही काही फरक पडत नाही, असेही खातुन म्हणाल्या.

बुरखा आणि हिजाब भारतीय संस्कृती आणि परंपरांचे अविभाज्य भाग आहेत. या मुद्द्यांचे राजकारण करून वाद निर्माण करणे भयंकर आहे. सरकार कोणताही पक्ष चालवू शकतो, पण महिलांना कमकुवत समजण्याची चूक कोणीही करू नये, असे रुबिना खानुम म्हणाल्या. ७ मार्च रोजी संपणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत समाजवादी पक्षाच्या नेत्या रुबिना खानुम यांनी हे विधान केले आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

हिजाब परिधान केल्यामुळे सहा मुस्लिम विद्यार्थिनींना उडुपी येथील महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर कर्नाटकात हिजाबचा वाद सुरू झाला. अनेक महाविद्यालये आणि शाळांनी समान आदेश जारी केल्याने ही समस्या राज्यभर पसरली. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्याच्या विरोधात आणि समर्थनात आणखी निदर्शने सुरू केली. मुस्लिम मुलींचा विरोध करण्यासाठी मुलांनी भगवे स्कार्फ घातले होते. या प्रकरणावरून वाद आणखी वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हिजाब प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाविरोधात करण्यात आलेल्या आव्हान अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. हा वाद आणखी वाढवू नका, असे आवाहनही यावेळी न्यायालयाने केले. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांना उद्देशून म्हणाले की, हा वाद आता आणखी वरच्या स्तरावर आणू नका. तेथे काय सुरू आहे, ते आम्हालाही माहित आहे. या गोष्टी दिल्लीत, राष्ट्रीय स्तरावर आणाव्यात काय, यावर तुम्हीसुद्धा विचार करा.