पाकिस्तानातील पंजाब प्रांतात एका जमीनदाराने तीन ख्रिश्चन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढल्याच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून आता येथील न्यायालयाने या घटनेची दखल घेऊन कसूरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांना या प्रकरणी चौकशी करून दोन आठवडय़ात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या तीन ख्रिश्चन महिलांना अमानुष मारहाण करण्यात आली व नंतर महंमद मुनीर या स्थानिक जमीनदाराच्या सशस्त्र गुंडांनी त्यांची नग्न करून धिंड काढली. या जमीनदाराला सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ गटाचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते. कसूर जिल्ह्य़ात पट्टोकी भागात ही घटना गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात घडली होती. आशियाई मानवी हक्क आयोगाने या घटनेची माहिती प्रसारमाध्यमांना दिली होती. गुरे चारण्याच्या किरकोळ प्रकारावरून सादिक मसीह याच्या मुलांची मुनीरशी बाचाबाची झाली होती. नंतर काही दिवसांनी मुनीर हा मसीहच्या घरी आला तेव्हा घरात पुरूष मंडळी नव्हती. त्याने हल्लेखोर तीन मुलांच्या बायकांना समवेत नेले व नंतर त्यांना विवस्त्र करून मारहाण केली व नंतर रस्त्यावरून नग्न धिंड काढली. या महिलांनी ओरडायला सुरूवात केली तेव्हा वयस्कर लोक मदतीला धावले व ते हल्लेखोरांच्या पाया पडले व महिलांना सोडण्यास सांगितले. नंतर त्यांनी या महिलांना जाऊ दिले व पोलिसात तक्रार दिल्यास याद राखा, असा दमही दिला.