scorecardresearch

मोदी यांच्या भूमिकेमुळे युक्रेन संघर्षांत जागतिक संकट टळले; ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्‍स यांचे मत

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती

मोदी यांच्या भूमिकेमुळे युक्रेन संघर्षांत जागतिक संकट टळले; ‘सीआयए’चे संचालक विल्यम बर्न्‍स यांचे मत
(संग्रहित छायाचित्र) photo source : indian express file photo

वॉशिंग्टन  : अण्वस्त्र वापराबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार घेतलेल्या भूमिकेचा रशियावर परिणाम झाल्यामुळे युक्रेन युद्धात जागतिक संकट टळले, असे प्रतिपादन अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (सीआयए) संचालक विल्यम  बर्न्‍स यांनी केले.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांनी अण्वस्त्रांच्या संभाव्य वापराबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याचा पुतिन यांच्यावर परिणाम झाला, असे मला वाटते, असे बर्न्‍स यांनी पब्लिक ब्रॉडकािस्टग सव्‍‌र्हिसला (पीबीएस) दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अण्वस्त्र वापराच्या धमकीमागे भीती दाखवण्याचा उद्देश होता, पण आजच्या घडीला अण्वस्त्र वापराची योजना रशियाकडे असल्याचा कोणताही थेट पुरावा मला आढळत नाही, असेही बर्न्‍स यांनी नमूद केले.

संघर्ष आणखी काही वेळ चालेल, रशिया सर्व शस्त्र-साधनांचा वापर युद्धात करेल, असे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ३ डिसेंबरला म्हटले होते. आण्विक युद्धाच्या ‘वाढत्या’ धोक्याबाबतही पुतिन यांनी इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर बर्न्‍स यांनी त्यांची निरीक्षणे या मुलाखतीत नोंदवली.

संवादातून तोडगा काढण्याच्या भारताच्या आवाहनामुळे पुतिन यांनी युक्रेन संघर्षांबाबतची भूमिका पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत स्पष्ट केली होती. सप्टेंबरमध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या वेळी दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष चर्चाही झाली होती. आजचे युग युद्धाचे नाही, असेही मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते.

‘हे युग युद्धाचे नाही’ 

रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून भारत चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आवाहन करीत आहे. १६ डिसेंबर रोजी पुतिन यांच्याशी झालेल्या दूरध्वनीवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचा पुनरुच्चार केला होता. आजचे युग युद्धाचे नाही, असेही मोदी यांनी पुतिन यांना सांगितले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-12-2022 at 02:29 IST

संबंधित बातम्या