पीटीआय, मुंबई

‘विमान कंपन्यांनी त्यांच्या ‘बोइंग-७८७’ आणि ‘७३७’ या विमानांचे इंधन नियंत्रक स्विच तपासून घ्यावेत,’ असे आदेश नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना दिले. अहमदाबाद विमान अपघात चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर झाल्यानंतर काहीच दिवसांत ‘डीजीसीए’ने हा आदेश जारी केला आहे. ही तपासणी २१ जुलैपर्यंत विमान कंपन्यांना पूर्ण करायची आहे. ‘एअर इंडिया’, ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’, ‘अकासा एअर’ आणि ‘स्पाइसजेट’ आदी कंपन्या ‘बोइंग ७८७’, ‘७३७’ विमाने वापरतात. या कंपन्यांना इंधन नियंत्रक स्विच तपासावा लागणार आहे. अमेरिकेच्या नागरी उड्डाण प्रशासनाने २०१८ मध्ये इंधनपुरवठा नियंत्रित करण्याच्या स्विचचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात ‘बोइंग’च्या ७८७ आणि ७३७ या प्रकारच्या विमानांचाही समावेश होता. ‘विशेष हवाई योग्यता माहिती बुलेटिन’मध्ये (एसएआयबी) त्याचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र कुठलेही निर्देश तेव्हा दिले गेले नव्हते.

‘डीजीसीए’ने सोमवारी सांगितले, ‘स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक विमान कंपन्यांनी त्यांच्या विमानांत ‘एसएआयबी’च्या माहितीनुसार तपासणी सुरू केली आहे, असे आमच्या निदर्शनास आले. अपघातग्रस्त विमानाशी संबंधित सर्व विमान कंपन्यांनी २१ जुलैपर्यंत तपासणी पूर्ण करावी. तपासणीचे नियोजन आणि तपासणी पूर्ण केल्याचा अहवाल आमच्याकडे द्यावा.’

इंधन नियंत्रक स्विच’चा काय उपयोग?

विमानातील इंधन नियंत्रक स्विच इंजिनला होणारा इंधनपुरवठा नियंत्रित करतात. बोइंग विमानाच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल शनिवारी प्रसिद्ध झाला. विमान अपघात चौकशी विभागाने (एएआयबी) सांगितले, ‘विमानाच्या दोन्ही इंजिनना होणारा इंधनपुरवठा एका सेकंदाच्या अंतरात थांबला होता. त्यामुळे विमानाच्या कॉकपिटमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कॉकपिटमध्ये एक वैमानिक दुसऱ्याला इंधनपुरवठा तुटल्यासंबंधी विचारत होता आणि दुसरा मी ते केले नाही, असे सांगता होता. असे रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येत आहे.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा वर्षांत दोनदा ‘टीसीएम’ बदलले’

‘एअर इंडिया’ कंपनीने बोइंग ७८७-८ विमानातील ‘थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल’ (टीसीएम) गेल्या सहा वर्षांत दोनदा बदलले आहे. बोइंग कंपनीने २०१९ मध्ये त्यासंबंधी सूचना दिल्या होत्या. सूत्रांनी ही माहिती दिली. ‘टीसीएम’मध्ये इंधन नियंत्रक स्विचचाही समावेश असतो. २०१९ आणि २०२३ मध्ये ‘टीसीएम’ बदलण्यात आला. ‘एएआयबी’च्या प्राथमिक अहवालात त्याची नोंद आहे. ‘टीसीएम’मधील बदल आणि इंधन नियंत्रक स्विचचा संबंध नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. बोइंग कंपनीने २०१९ मध्ये ड्रीमलायनर वापरणाऱ्यांसाठी देखभाल नियोजन (एमपीडी) जाहीर केले होते. त्यात २४ हजार किलोमीटरनंतर ‘टीसीएम’ बदलण्याचे सांगण्यात आले होते. अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या चौकशीनंतर विमानातील इंजिनना इंधनपुरवठा उड्डाणानंतर बंद झाला होता, ही बाब समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘बोइंग’ने गेल्या सहा वर्षांत दोनदा ‘टीसीएम’ बदलला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.