CJI BR Gavai on Justice for All : भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई म्हणाले की “न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही, न्याय हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. न्यायाचा प्रकाश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि ते न्यायाधीश व वकिलांचं कर्तव्य आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कायदेशीर मदतीसंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले, “कायदेशीर सेवा ही एक चळवळ आहे आणि त्याचे परिणाम आकडेवारी आणि वार्षिक अहवालांमध्ये नव्हे तर दुर्लक्षित नागरिकांच्या आत्मविश्वासात व कृतज्ञतेत दिसून येतात.”
बी. आर. गवई यांनी यावेळी त्यांच्या मणिपूर भेटीचा उल्लेख केला. ते म्हणाले, “मणिपूरमधील एक घटना माझ्या मनात कायमची कोरली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी, जेव्हा मी एनएएलएसएचा कार्यकारी अध्य़क्ष होतो तेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांसह मणिपूरला गेलो होतो. या भेटीवेळी मणिपूरमधील चुराचंदपूर येथील एका शिबिरात विस्थापितांना साहित्य वाटप करण्यासाठी गेलो होते. तेव्हा एक वृद्ध महिला पुढे आली, तिच्या डोळ्यांत अश्रू होते, ती हात जोडून मला म्हणाली, दादा, असाच राहा!”
कायदेशीर चळवळीचं फळ हे दुर्लक्षितांच्या आत्मविश्वासात आहे : सरन्यायाधीश
सरन्यायाधीश म्हणाले, “त्या महिलेचं वाक्य ऐकून एक गोष्ट माझ्या मनात कायमची अधोरेखित झाली. कायदेशीर चळवळीचं खरं प्रतिफळ आकडेवारी किंवा वार्षिक अहवालांमध्ये नसून एकेकाळी दुर्लक्षित वाटलेल्या नागरिकांच्या कृतज्ञेत आणि त्यांच्या आत्मविश्वासात आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास आपल्या यशाचं खरं मोजमाप संख्यांमध्ये नव्हे तर सामान्य माणसाच्या विश्वासात आहे. कोणीतरी, कुठेतरी, त्यांच्याबरोबर उभं राहण्यास तयार आहे आणि तो उभा राहील हा त्यांचा विश्वास आहे.”
“तुमची एखाद्या ठिकाणी काही वेळेसाठीची उपस्थिती, एका दिवसाची भेट, गावाला किंवा तुरंगाला दिलेली भेट, संकटात सापडलेल्या व्यक्तीशी तुमचं संभाषण हे त्या व्यक्तीचं जीवन बदलणारं असू शकतं. ज्याला कधी मदत मिळेल असं वाटलं नव्हतं त्यालाही हायसं वाटतं.”
सरन्यायाधीश म्हणाले, “न्याय हा काही मोजक्या लोकांचा विशेषाधिकार नाही. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. न्यायाधीश, वकील, न्यायालयीन अधिकारी म्हणून आपली भूमिका ही समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायाचा प्रकाश पोहोचवण्याची असली पाहिजे. आपण आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पडल्या तर दुर्लक्षित घटकांचाही आत्मविश्वास वाढतो.”
