देशाचे सरन्यायाधीश उदय लळित यांनी मंगळवारी (११ ऑक्टोबर) पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे ललीत यांच्यानंतर सरन्यायाधीशपदावर आणखी एक मराठी व्यक्ती बसणार आहे. सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललीत यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारं पत्र केंद्र सरकारला पाठवलं.

लळित ८ नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदावरून निवृत्त होत आहेत. केंद्रीय कायदा मंत्रालयाने परंपरेप्रमाणे विद्यमान सरन्यायाधीश लळित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. यानंतर लळीत यांनी प्रक्रियेनुसार, सर्वोच्च न्यायालयात त्यांच्यानंतर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली.

धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ ला निवृत्त होत आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

कोण आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे धनंजय यशवंत चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कायद्याचं पुढील शिक्षण आणि डॉक्टरेट अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कुलमधून घेतली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही ठिकाणी वकिली केली. जून १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील म्हणून मान्यता मिळाली.

१९९८ ते २००० या काळात धनंजय चंद्रचूड यांनी अॅडिशनल सॉलिसीटर जनरल म्हणून काम केलं. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र ज्युडिशीयल अकॅडमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं. ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी चंद्रचूड अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली.

हेही वाचा : “विवाहित असो किंवा अविवाहित प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांनी २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या काळात सरन्यायाधीशपदावर काम केलं. धनंजय चंद्रचूड यांच्या आई प्रभा चंद्रचूड या शास्त्रीय संगीत गायिका आहेत.