पीटीआय, कोची : विधानसभा अध्यक्ष पक्षपाती असल्याचा आरोप करत विरोधक असलेल्या संयुक्त लोकशाही आघाडीच्या (यूडीएफ) आमदारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष ए. एन. शमसीर यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. मात्र त्यांना अडविणाऱ्या मार्शल आणि आमदारांमध्ये हाणामारी झाली. त्यात चार आमदार आणि सात मार्शल जखमी झाले.

वॉच-अँड-वॉर्ड कर्मचारी, ज्यांना सभागृह मार्शल म्हणूनही ओळखले जाते, ते राज्य विधानसभेच्या सुरक्षेची देखरेख करतात आणि सभागृह अध्यक्ष आणि विधानमंडळ सचिव यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. बुधवारी सकाळी विधानसभेच्या संकुलात विरोधकांनी सभात्याग करून शमसीर यांच्या कार्यालयाकडे कूच केली.  ‘सभापतींनी न्याय द्यावा’, अशी घोषणाबाजी करत हातात फलक घेऊन त्यांनी अध्यक्षांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला.  महिला सुरक्षेबाबत सभागृहात स्थगन प्रस्तावाची विरोधकांची नोटीस सभापतींनी नाकारल्याने त्यांनी हा मोर्चा काढला.

सभागृह मार्शलनी विरोधी आमदारांना सभापती कार्यालयाच्या आवारातून बळजबरीने हटविण्याचा प्रयत्न केल्याने विधानसभा संकुलात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मार्शल आणि आमदार यांच्यात आधी वादावादी झाली आणि त्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने आरोप केला की सभागृह मार्शलव्यतिरिक्त काही सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि काही मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांनीही विरोधी आमदारांवर हल्ला केला.