Karnataka Bhavan Case : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. मात्र, असं असतानाच आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या एसडीओ अधिकाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे एसडीओ अधिकारी यांच्यात आधी वाद झाला. मात्र, या वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा वाद कर्नाटक भवनमध्ये झाल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सहाय्यक निवासी आयुक्त आणि विशेष अधिकारी सी. मोहन कुमार यांच्यात हा वाद झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. एच. अंजनेय यांनी सी. मोहन कुमार यांच्यावर बुटाने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील कर्नाटक भवनात हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.
औपचारिक तक्रार दाखल, चौकशी सुरू
उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय यांनी या प्रकरणासंदर्भात औपचारिक तक्रार दाखल केली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. तसेच या तक्रारीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विशेष अधिकारी सी. मोहन कुमार यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत चौकशी सुरू करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे.
एच. अंजनेय यांनी काय आरोप केले?
डीके शिवकुमार यांचे विशेष अधिकारी एच. अंजनेय यांनी म्हटलं की, “मला बुटाने मारहाण करण्यात आलं. त्यामुळे माझ्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्यावर (सी. मोहन कुमार) फौजदारी खटला दाखल करण्यात यावा आणि मला न्याय देण्यात यावा”, असं एच. अंजनेय यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या घटनेनंतर, एच. अंजनेय यांनी कर्नाटकचे अतिरिक्त निवासी आयुक्त (एआरसी) आणि मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत निवासी आयुक्त इमकोंगला जमीर यांनी या घटनेची पुष्टी करत आम्हाला २२ जुलै रोजी तक्रार मिळाली असून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे.