केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशभरातील ९१.१ टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेत यश मिळवले. यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील विनायक श्रीधर याला इंग्रजीमध्ये १०० पैकी १००, विज्ञानामध्ये ९६ आणि संस्कृतमध्ये ९७ गुण मिळवले आहेत. मात्र हा निकाल पाहण्यासाठी विनायक या जगात नाही ही शोकांकिकाच म्हणावी लागेल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना ज्या आजाराने ग्रासले होते त्याच आजाराने विनायकचा परिक्षेदमरम्यानच मृत्यू झाला. ड्यूकेने स्नायू डिस्ट्रॉफी ह्या आजाराने विनायकला ग्रसले होते. व्हिलचेअरवरच तो बसून असतो.

नोएडामधील अमेठी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या विनायक श्रीधरने तीन विषयात जवळपास १०० गुण मिळवले. प्रसिद्ध दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याप्रमाणेच ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) हा दुर्धर आजार झाला होता. त्यामुळे विनायकने तिन्ही पेपर व्हीलचेअरवर बसूनच दिले. विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या कोट्यामधून परिक्षा न देता विनायकने सर्व सामान्य मुलांप्रमाणेच दहावीची परीक्षा दिली होती. इंग्रजी आणि विज्ञान विषयात एका शिक्षिकेची मदत घेतली होती. पण संस्कृतचा पेपर त्यांनं स्वतः लिहिला होता. मात्र हे तीन पेपर दिल्यानंतर उर्वरित दोन पेपर देण्याआधीच मृत्यूने विनायकला गाठले. विनायकला अंतराळवीर व्हायचे होते, मात्र त्याचे ते स्वप्न अपूर्णच राहिले.

विनायक श्रीधर

‘माझ्या मुलाची बुद्धी खूप तल्लख होती. त्याच्या स्नांयूची हालचाल खूपच मर्यादित होती तरी तो हळूहळू लिहू शकत होता. मात्र परिक्षेसाठी तीन तासांची मर्यादा असल्याने त्याने इंग्रजी आणि विज्ञान विषयांचा पेपर एका मतदनीसाच्या सहाय्याने लिहिला होता. मात्र संस्कृतचा पेपर त्याने स्वत:च लिहिला होता,’ असं विनायकची आई ममता श्रीधर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दहावीची परिक्षा झाल्यानंतर रामेश्वरमला जाण्याची इच्छा विनायकने व्यक्त केली होती. त्यासंदर्भातील सर्व बुकींगही झाले होते. मात्र परिक्षा सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. आता निकाल लागल्यानंतर विनायकचे आई वडील त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी रामेश्वरमला जाणार आहेत.